पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडकडून पराभव स्विकारल्यानंतर भारताने तिसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावत भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यात मदत केली. विराटने १०३ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या. त्यामुळे उरलेल्या दोन दिवसांच्या खेळात भारतीय गोलंदाज इंग्लंडला सर्वबाद करुन कसोटी मालिकेत पुनरागमन करु शकतात का याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान ट्रेंट ब्रिज कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळात तब्बल विक्रमांची नोंद करण्यात आली.

५ – इंग्लंडमध्ये आतापर्यंत भारताच्या ५ खेळाडूंनी एकाच कसोटीत ५ विकेट आणि ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत हार्दिक पांड्याने ५ बळी आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करत मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. याआधी भारताकडून लाला अमरनाथ, विनू मंकड, कपिल देव आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनी असा करिष्मा करुन दाखवला आहे.

१३ – भारताबाहेर विराट कोहलीचं हे तेरावं शतक ठरलं आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर (२९ शतकं), राहुल द्रविड (२१ शतकं) आणि सुनिल गावसकर (१८ शतकं) हे खेळाडू कोहलीच्या पुढे आहेत.

१६ – कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे १६ वं शतक ठरलं. (गेल्या ६३ डावांमधील) या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ (२५ शतकं) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग (१९ शतकं) कोहलीच्या पुढे आहेत.

२३ – कसोटी क्रिकेटमधलं विराट कोहलीचं हे २३ वं शतकं ठरलं. याचसोबत विराटने विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारताकडून सचिन तेंडुलकरने ५१, राहुल द्रविडने ३६, सुनिल गावसकर यांनी ३४ शतकं झळकावली आहेत.

२५ – कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करण्याची भारतीय संघाची ही २५ वी वेळ ठरली आहे. यापैकी १४ वेळा भारताने घराबाहेरच्या मैदानावर ही कामगिरी केली आहे. २००२ आणि २०१४ सालानंतर ट्रेंट ब्रिज कसोटीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही तिसरी वेळ आहे.

२०० – एका कसोटीत दोन डावांमध्ये मिळून विराट कोहलीच्या २०० धावा. गेल्या ३८ कसोटींमध्ये विराटने १० वेळा अशी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने सातवेळा अशी कामगिरी केली आहे.