पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. पहिल्या दिवसातल्या खेळाची महत्वाची गोष्ट म्हणजे, गेले काही दिवस आपल्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेला कालच्या सामन्यात सूर गवसला आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत अजिंक्यने पहिल्या दिवसाच्या खेळात १५९ धावांची शतकी भागीदारी केली. कर्णधार विराट कोहलीचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. तो आदिल रशिदच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकडे झेल देत माघारी परतला. याचसोबत अजिंक्यनेही ८१ धावा करत विराटला भक्कम साथ दिली.

दरम्यान ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या दिवसाच्या खेळात तब्बल १० विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय कर्णधाराने भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढलेल्या नाहीयेत. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. सौरवने भारताबाहेर २८ कसोटी सामन्यांमध्ये १६९३ धावा केल्या आहेत. कालच्या खेळीत विराटने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

१ – कसोटी क्रिकेट पदार्पणात षटकाराने डावाची सुरुवात करणारा ऋषभ पंत पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

२ – इंग्लंडमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर. विराटने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ८ वेळा ही कामगिरी केली आहे. महेंद्रसिंह धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, धोनीने आतापर्यंत १० वेळा अशी कामगिरी केली आहे.

२ – कसोटी क्रिकेटमध्ये नव्वदीत बाद होण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली आहे.

३ – आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसात नोंदवलेली ३०७ ही धावसंख्या तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. २००९ साली वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारताने ३७५ तर २००१ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३७२ धावसंख्या उभारली होती.

४ – इंग्लंडमध्ये कर्णधार या नात्याने पहिल्या ५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर. या यादीत महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली हे कर्णधार पुढे आहेत.

५ – भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऋषभ पंत पाचवा लहान खेळाडू ठरला आहे.

१२ – कसोटी क्रिकेटच्या इतिहासात षटकाराने डावाची सुरुवात करणारा ऋषभ पंत १२ वा खेळाडू ठरला आहे.

१०० – जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा, मुथय्या मुरलीधरननंतरचा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.

३०७ – इंग्लंडमध्ये पहिल्या दिवसाअखेरीस भारताने नोंदवलेली ३०७ ही धावसंख्या तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. १९९० साली ओव्हल कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ३२४ धावा केल्या होत्या.