आयर्लंडविरूद्धचा दुसरा टी-२० सामनाही भारताने आरामात आपल्या खिशात घातला. भारताने दिलेले २१४ धावांचे आव्हान आयर्लंडला  पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १२.३ षटकांत ७० धावांत आटोपला. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या फिरकीने आजही कमाल केली. दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्यांना उमेश यादवने चांगली साथ दिली. यादवेनही २ गडी टिपले. आयर्लंडकडून पोर्टरफिल्ड (१४ धावा), विल्सन (१५), थॉम्पसन (१३) आणि रँकीन (१०) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. सामनावीराचा पुरस्कार लोकेश राहुल याला देण्यात आला.

तत्पूर्वी, आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यामध्येही भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर लोकेश राहुल आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनाने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकात २१३ धावांचा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा आयर्लंडचा निर्णय आज पुन्हा एकदा त्यांच्या अंगलट आला. ४ बदल केलेल्या भारतीय संघाने आज प्रथम फलंदाजीसाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना मैदानात उतरवलं. विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात आयर्लंडच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र त्यानंतर लोकेश राहुल आणि सुरेश रैनाने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. राहुल माघारी परतल्यानंतर भारताचा डाव मधल्या काळात काहीसा गडबला होता, मात्र सुरेश रैना आणि मनिष पांडे-हार्दिक पांड्या या जोडीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला २०० चा टप्पा गाठून दिला.

आयर्लंडकडून केविन ओब्रायनने ३ तर पिटर चेसने १ बळी घेतला. सलग दुसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर २०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान दिलं.

  • लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार
  • भारताचा सलग दुसऱ्या सामन्यात विजय
  • १२.३ षटकांत आयर्लंडचा डाव ७० धावांत तंबूत
  • यजुवेंद्र चहल-कुलदीप यादवच्या फिरकीसमोर आयर्लंडचे पुन्हा लोंटागण
  • सिमी सिंह भोपळाही न फोडता माघारी, आयर्लंडला सहावा धक्का
  • हार्दिक पांड्याने दूर केला केविन ओब्रायना अडसर दूर, आयर्लंडचा निम्मा संघ माघारी
  • युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाल्बरिन माघारी, आयर्लंडला चौथा धक्का
  • टी-२० क्रिकेटमध्ये सिद्धार्थ कौलचा पहिला बळी
  • ठराविक अंतराने सलामीवीर शेनॉन सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर माघारी
  • विल्यम पोर्टरफिल्डचा उमेशने उडवला त्रिफळा, आयर्लंडचा दुसरा गडी माघारी
  • सलामीवीर स्टर्लिंग उमेश यादवच्या गोलंदाजीवर माघारी, आयर्लंडला पहिला धक्का
  • डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान आयर्लंडची खराब सुरुवात
  • आयर्लंडला विजयासाठी २१४ धावांचं आव्हान
  • भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा, २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात भारताची २१३ धावांपर्यंत मजल
  • भारताचे ४ गडी माघारी
  • ओब्रायनचा पुन्हा एकदा भारताला धक्का, सुरेश रैना माघारी
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची छोटेखानी भागीदारी
  • सुरेश रैना- मनिष पांडेच्या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या डावाला आकार
  • पाठोपाठ रोहित शर्माही माघारी, भारताचा तिसरा गडी माघारी
  • लोकेश राहुल ओब्रायनच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून माघारी, भारताला दुसरा धक्का
  • भारताची जमलेली जोडी फोडण्यात आयर्लंडला यश
  • सुरेश रैना – लोकेश राहुलमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • लोकेश राहुलने सुरेश रैनाच्या साथीने संघाचा डाव सावरला
  • भारताने गाठला ५० धावांचा टप्पा
  • पिटर चेसच्या गोलंदाजीवर विराट कोहली माघारी, भारताला पहिला धक्का
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • कर्णधार विराट कोहली लोकेश राहुलसोबत सलामीला
  • लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, उमेश यादवला संघात जागा
  • भारतीय संघात ४ महत्वाचे बदल, धोनी, धवन, भुवनेश्वर, बुमराहला विश्रांती
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय