शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. भारताने २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली, मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ १३२ धावाच करु शकला. फिरकीपटू कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या फिरकीच्या जाळ्यात आयर्लंडचे सर्व फलंदाज अलगद अकडले, अशाप्रकारे ७६ धावांनी विजय मिळवत भारताने २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात तब्बल १५ विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – कुलदीप यादवच्या खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये १६ बळी. मायकेल रिपॉनच्या १५ बळींचा विक्रम मागे टाकत कुलदीप सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा मनगटी फिरकीपटू ठरला आहे.

१ – शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी टी-२० क्रिकेटमध्ये १५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचणारी पहिली जोडी ठरली आहे. कालच्या सामन्यात दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा आतापर्यंत ३ वेळा १५० पेक्षा जास्त धावांच्या भागीदारीमध्ये सहभागी आहे. (दोन वेळा शिखर धवनसोबत, एक वेळा लोकेश राहुल सोबत)

१ – Malahide’s Cricket Ground हे दोन कसोटी खेळणाऱ्या देशांचा टी-२० सामना भूषविणारं आयर्लंडचं पहिलं क्रिकेट ग्राऊंड ठरलं आहे.

२ – २०८/५ आयर्लंडविरुद्ध सामन्यात भारताची ही धावसंख्या सर्वात दुसरी मोठी धावसंख्या ठरली आहे. २०१७ साली अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २३३/८ एवढी मोठी धावसंख्या उभारली होती.

३ – देशाचा पहिला टी-२० सामना व शंभरावा टी-२० सामना या दोन्ही सामन्यांमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या संख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी.
भारताकडून धोनी आणि रैना या कसोटीत उतरले आहेत. या यादीमध्ये पाकिस्तान हा पहिल्या तर श्रीलंका हा दुसऱ्या स्थानावर आहे.

४ – रोहित आणि शिखर धवनमध्ये झालेली १६० धावांची भागीदारी ही टी-२० क्रिकेटमधली चौथी मोठी भागीदारी ठरली आहे.

४/२१ – टी-२० क्रिकेटमध्ये कुलदीप यादवची ही कामगिरी त्याची सर्वोत्तम कामगिरी असून, याचसोबत चायनामन गोलंदाजांच्या यादीत लक्षन संदकन (४/२३) याच्या नावावर असलेला विक्रमही कुलदीप यादवने काल आपल्या नावावर केला.

५ – टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर पोहचला आहे. या यादीमध्ये रोहितच्या पुढे ब्रँडन मॅक्युलम, मार्टीन गप्टील, शोएब मलिक, विराट कोहली हे फलंदाज पुढे आहेत.

६ – टी-२० क्रिकेटमध्ये ६ हजार धावा करणारा शिखर धवन हा सहावा फलंदाज ठरला आहे. सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी हे फलंदाज शिखर धवनच्या पुढे आहेत.

७ – १०० टी-२० सामना खेळणारा भारत हा सातवा संघ ठरला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी आतापर्यंत शंभर सामन्यांचा पल्ला गाठला आहे.

१० – २०० पेक्षा जास्त धावसंख्या केलेली असताना भारताचा हा दहावा विजय ठरला आहे. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिका (११) भारताच्या पुढे आहे.

१३ – रोहित आणि शिखर धवनने केलेली शतकी भागीदारी ही भारताची १३ वी शतकी भागीदारी ठरली. यापैकी ७ भागीदाऱ्यांमध्ये रोहित शर्मा सहभागी आहे.

१७ – रोहित शर्माने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये १७ वेळा ५० पेक्षा जास्त धावसंख्या केली आहे. विराट कोहलीने १८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

४९ – कालच्या सामन्याआधी आयर्लंडच्या जेम्स शेनॉनच्या नावावर अवघ्या ४९ धावा जमा होत्या. कालच्या सामन्यात शेनॉने खात्यातील धावांपेक्षा ११ धावा जास्त केल्या. शेनॉनने कालच्या सामन्यात पहिलं अर्धशतक झळकावलं, शेनॉनने ६० धावा पटकावल्या.

७६ – भारताने आयर्लंडवर ७६ धावांनी मात केली. हा भारताचा टी-२० क्रिकेटमधला चौथा मोठा विजय ठरला आहे. याचसोबत आशिया खंडाबाहेर भारताचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे.