न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे दारुण पराभव पत्करणारा भारतीय संघ ईडन पार्कला शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमनासाठी उत्सुक आहे.

बुधवारी रात्री पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा ८० धावांनी पराभव झाला. त्यानंतर एकच दिवसाच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत. न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सेफर्टने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत ४३ चेंडूंत ८४ धावांची दिमाखदार खेळी साकारली. हार्दिक पंडय़ा आणि खलील अहमद यांच्यासह भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरही किवी फलंदाजांनी फटकेबाजी करीत षटकाला १२ धावांची सरासरी राखली.

अहमदच्या जागी सिद्धार्थ कौल किंवा मोहम्मद सिराज यांना संघात स्थान दिले जाऊ शकते. कृणाल पंडय़ा आणि यजुर्वेद्र चहल यांचा फिरकी मारा अप्रतिम आहे. परंतु ‘चायनामन’ कुलदीप यादवच्या नावाचासुद्धा विचार केला जाऊ शकतो.

पहिल्या सामन्यासाठी अष्टपैलू विजय शंकरला तिसऱ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. त्याने १८ चेंडूंत २७ धावा काढून त्याला न्याय दिला. एकदिवसीय मालिकेत दोनदा अपयशी ठरणाऱ्या शुभमन गिलला संधी मिळणे कठीण दिसत आहे.

संघ

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंडय़ा, मोहम्मद सिराज.
  • न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, स्कॉट कुगेलिन, कॉलिन मुन्रो, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, रॉस टेलर, जेम्स नीशाम.

सामन्याची वेळ : सकाळी ११.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १