07 March 2021

News Flash

Ind vs NZ 2nd Test : पहिला दिवस यजमानांनी गाजवला, भारतीय गोलंदाज हतबल

चहापानानंतर भारतीय फलंदाजांची हाराकिरी

ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. भारतीय संघाने केलेल्या २४२ धावांना प्रत्युत्तर देताना दिवसाअखेरीस न्यूझीलंडने बिनबाद ६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर टॉम लॅथम २७  तर टॉम ब्लंडल २९ धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. त्याआधी, मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका भारतीय फलंदाजांनी संघाला बसला. चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ २४२ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.

कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने या सामन्यात आपल्या फलंदाजीत बदल करत चांगले फटके खेळले. मात्र ट्रेंट बोल्टने मयांक अग्रवालला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या सोबतीने भारतीय संघाचा डाव सावरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत पृथ्वीने काही सुरेख मैदानी फटके खेळले. निल वँगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत पृथ्वीने आपलं अर्धशतकही साजरं केलं. पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला. मात्र अर्धशतकी खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात पृथ्वीला अपयश आलं. जेमिनसनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने पृथ्वीचा सुरेख झेल टिपला.

उपहाराच्या सत्रानंतर टीम इंडियाचे महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाले. विराट ३ धावांवर साऊदीच्या गोलंदाजीवर तर रहाणे ७ धावांवर माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजारा आणि हुनमा विहारीने संयमी खेळी करत भारताची अधिक पडझड थांबवली. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ८१ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने यादरम्यान आपलं अर्धशतकं साजरं केलं. पाठोपाठ हनुमा विहारीनेही अर्धशतक झळकावलं. चहापानाच्या सत्राआधी हनुमा विहारी वँगरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ५५ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – Ind vs NZ : अपयश विराटची पाठ सोडेना, सलग दुसऱ्या कसोटीत स्वस्तात बाद

चहापानाच्या सत्रानंतर पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. चेतेश्वर पुजारा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जेमिसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या फळीत मोहम्मद शमीने फटकेबाजी करत भारताला २४२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. उंचपुऱ्या जेमिसनने भारताच्या शेपटाला गुंडाळण्याचं काम केलं. न्यूझीलंडकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर निल वँगरने १ बळी घेतला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

12:27 (IST)29 Feb 2020
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडचं सामन्यावर वर्चस्व

न्यूझीलंड बिनबाद ६३, ब्लंडल-लॅथम जोडीची अर्धशतकी भागीदारी

12:11 (IST)29 Feb 2020
न्यूझीलंड सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल जोडीची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

भारतीय गोलंदाज सलामीची जोडी फोडण्यात अपयशी

10:32 (IST)29 Feb 2020
भारताचा अखेरचा फलंदाज माघारी, २४२ धावांपर्यंत मजल

ट्रेंट बोल्टने उडवला मोहम्मद शमीचा त्रिफळा, अखेरच्या फळीत शमीची फटकेबाजी

10:11 (IST)29 Feb 2020
रविंद्र जाडेजा फटकेबाजी करण्याच्या नादात बाद

जेमिसनच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ ट्रेंट बोल्टने घेतला झेल

10:06 (IST)29 Feb 2020
भारताचा आठवा गडी माघारी

उमेश यादव भोपळाही न फोडता जेमिसनच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देत बाद

10:02 (IST)29 Feb 2020
भारताला सातवा धक्का, ऋषभ पंत माघारी

जेमिसनच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन यष्ट्यांवर आदळला

09:59 (IST)29 Feb 2020
भारतीय संघाने ओलांडला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा

पुजारा-जाडेजा जोडी मैदानात, मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाजांची हाराकिरी

09:55 (IST)29 Feb 2020
चहापानाच्या सत्रानंतर भारताला पहिला धक्का, चेतेश्वर पुजारा माघारी

जेमिसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वॉटलिंगकडे झेल देत पुजारा माघारी

५४ धावा करत पुजारा बाद

09:32 (IST)29 Feb 2020
चहापानाच्या सत्राआधी हनुमा विहारी माघारी परतला

निल वँगरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वॉटलिंगने घेतला झेल

हनुमा विहारीची ५५ धावांची खेळी, चहापानापर्यंत भारत ५ गडी बाद १९४

09:08 (IST)29 Feb 2020
चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक, भारताची झुंज सुरुच

पाचव्या विकेटसाठी पुजारा आणि हुनमा विहारी जोडीची महत्वपूर्ण भागीदारी

07:54 (IST)29 Feb 2020
अजिंक्य रहाणे माघारी, भारताला चौथा धक्का

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर चेंडू अजिंक्यच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये रॉस टेलरच्या हातात

भारतीय संघाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा, अजिंक्यची अवघ्या ७ धावांची खेळी

07:17 (IST)29 Feb 2020
उपहारानंतरच्या सत्रात भारताला पहिला धक्का

कर्णधार विराट कोहली टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी, केल्या अवघ्या  ३ धावा

06:39 (IST)29 Feb 2020
उपहाराच्या सत्रापर्यंत भारत सुस्थितीत

विराट-पुजारा जोडीने भारताची पडझड रोखली

२ बाद ८५ धावसंख्येपर्यंत भारताची मजल

06:21 (IST)29 Feb 2020
अर्धशतकी खेळीनंतर लगेचच पृथ्वी शॉ माघारी

जेमिनसनच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी झेलबाद

टॉम लॅथमने स्लिपमध्ये घेतला पृथ्वी शॉचा भन्नाट झेल

६४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीच्या ५४ धावा, परदेशातलं पृथ्वीचं पहिलं अर्धशतक

06:20 (IST)29 Feb 2020
पृथ्वी शॉचं अर्धशतक

चेतेश्वर पुजाराच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करताना पृथ्वी शॉची आश्वासक खेळी

निल वेंगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत साजरं केलं अर्धशतक

05:39 (IST)29 Feb 2020
भारताने ओलांडला अर्धशतकी धावसंख्येचा टप्पा

पृथ्वी शॉ - चेतेश्वर पुजारा जोडीची संयमी फलंदाजी

05:14 (IST)29 Feb 2020
आश्वासक सुरुवातीनंतर भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर अग्रवाल पायचीत, ७ धावा काढत मयांक बाद

04:23 (IST)29 Feb 2020
भारतीय संघात दोन महत्वाचे बदल, इशांत-आश्विन संघाबाहेर

उमेश यादव-रविंद्र जाडेजाला संघात स्थान

04:22 (IST)29 Feb 2020
नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा विल्यमसनच्या बाजूने

न्यूझीलंडच्या संघात एकमेव बदल, एजाझ पटेलच्या जागी निल वेंगरला संघात स्थान

04:21 (IST)29 Feb 2020
पहिल्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधीच ख्राईस्टचर्चमध्ये पावसाची हजेरी

नाणेफेकीला विलंब, सव्वाचार वाजता झाली नाणेफेक

टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 ICC Women’s T20 World Cup 2020 : फलंदाजीतील त्रुटी सुधारण्याची संधी!
2 जागतिक पदकांमध्ये उणीव ऑलिम्पिक पदकाचीच!
3 टोक्यो ऑलिम्पिक नियोजित वेळापत्रकानुसारच!
Just Now!
X