विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.

भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस १०३ धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. लॅथमने ५२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर टॉम ब्लंडलने आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. मात्र ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या डावात भारताकडून बुमराहने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

त्याआधी, दुसऱ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात ९० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. हनुमा विहारी टीम साऊदीच्या गोलंदाजीवर वॉटलिंगकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी हे फलंदाजही एकामागोमाग एक माघारी परतले. रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताला शतकी आघाडी मिळवून दिली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने ४, टीम साऊदीने ३ तर डी-ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

08:17 (IST)02 Mar 2020
रॉस टेलर - हेन्री निकोल्स जोडीकडून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब

७ गडी राखत न्यूझीलंडची सामन्यात बाजी, मालिकाही २-० ने जिंकली

कसोटी अजिंक्यप स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला मालिका पराभव

वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही टीम इंडियाला व्हाईटवॉश

08:03 (IST)02 Mar 2020
भारताची अखेरच्या षटकांमध्ये झुंज...टॉम ब्लंडल त्रिफळाचीत

जसप्रीत बुमराहच्या भन्नाट स्विंगवर ब्लंडल त्रिफळाचीत, ५५ धावांची खेळी करत ब्लंडल बाद

07:56 (IST)02 Mar 2020
टॉम ब्लंडलचं अर्धशतक

उमेश यादवच्या गोलंदाजीवर चौकार खेचत ब्लंडलचं अर्धशतक, भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल

07:53 (IST)02 Mar 2020
कर्णधार केन विल्यमसन माघारी, न्यूझीलंडला दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने घेतला झेल

07:37 (IST)02 Mar 2020
अखेरीस उमेश यादवने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी

अर्धशतकवीर टॉम लॅथम माघारी, यष्टीरक्षक ऋषभ पंतने एकहाती घेतला झेल, लॅथमची ५२ धावांची खेळी

07:30 (IST)02 Mar 2020
टॉम लॅथमचं अर्धशतक, न्यूझीलंडची विजयाच्या दिशेने वाटचाल

संघाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा, दोन्ही फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना

06:13 (IST)02 Mar 2020
न्यूझीलंडच्या सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

ब्लंडल आणि लॅथम यांची महत्वपूर्ण भागीदारी

पहिल्या सत्राअखेरीस न्यूझीलंड बिनबाद ४६, यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल

04:55 (IST)02 Mar 2020
भारतीय संघाचा अखेरचा फलंदाजही माघारी

बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बुमराह धावचीत

१२४ धावांमध्ये भारताचा दुसरा डाव आटोपला, १३१ धावांची आघाडी

न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान

04:35 (IST)02 Mar 2020
मोहम्मद शमीही माघारी परतला, भारताला नववा धक्का

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर ब्लंडलने घेतला झेल

04:16 (IST)02 Mar 2020
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतही माघारी

भारतीय संघाचा आठवा गडी माघारी

04:16 (IST)02 Mar 2020
भारताला सातवा धक्का, हनुमा विहारी माघारी

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वॉटलिंगने घेतला झेल

04:06 (IST)02 Mar 2020
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

भारतीय संघाकडे शतकी आघाडी