भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील केप टाऊन कसोटीमधील तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून पावसाने केप टाऊनमध्ये हजेरी लावली. सुरुवातीला काहीकाळासाठी पाऊस थांबेल असा अंदाज मैदानातील कर्मचारांनी व्यक्त केला होता. मात्र जराशीही उसंत न घेता पडणारा पाऊस आणि त्यामुळे मैदानावर साचलेलं पाणी यामुळे पंचांनी अखेर तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवशी एकाही  षटकाचा खेळ होऊ शकला नाही.

त्याआधी दुसऱ्या दिवसाच्या खेळात हार्दिक पांड्याने केलेल्या ९३ धावांच्या जोरावर भारताने केप टाऊन कसोटीत कमी धावसंख्येत बाद होण्याची नामुष्की टाळली. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ २०९ धावांमध्ये बाद झाला. त्यामुळे पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस झटपट धावा काढून भारतावर आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नान आफ्रिकेचे सलामीचे फलंदाज एडन मार्क्रम आणि डीन एल्गर हे काही प्रमाणात यशस्वीही झाले, मात्र फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या हार्दिक पांड्याने दोघाही फलंदाजांना माघारी धाडत भारताचं आव्हान कायम राखलं आहे.

टाचेला झालेल्या दुखापतीमुळे आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन हा या सामन्यात खेळू शकणार नाहीये. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचं काहीसं काम सोपं झालेलं आहे. मात्र तिसऱ्या दिवशी पावसामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेल्याने, ही कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी भारताचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचांकडून तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
  • तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ उशीराने सुरु होणार
  • दुसऱ्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६५/२