केप टाऊन कसोटीपाठोपाठ सेंच्युरिअन कसोटीतही भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताला १३५ धावांनी पराभूत करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या कसोटीत एकही भारतीय फलंदाज आफ्रिकेच्या जलद माऱ्यासमोर तग धरु शकला नाही. भारतीय फलंदाजीचा भक्कम आधार म्हणून ओळख असलेला चेतेश्वर पुजाराही या सामन्यात अपयशी ठरल्या. पराभवानंतरही पुजाराच्या नावावर दुसऱ्या कसोटीत एका विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये धावबाद होणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

एका कसोटीत दोन्ही डावांमध्ये धावबाद होण्याचा प्रसंग २००० साली वेलिंग्टन कसोटीत घडला होता. झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग हा खेळाडू दोन्ही डावांमध्ये धावबाद होऊन माघारी परतला होता. चेतेश्वर पुजाराचा दुसऱ्या डावातला बळी हा एखाद्या फलंदाजाने अशा पद्धतीने बाद होण्याची २५ वी वेळ ठरली. याआधी हन्सी क्रोंजे, मार्वन अट्टापट्टू, अॅडम परोरे, इयन हेली, मार्क टेलर हे खेळाडू अशा पद्धतीने बाद झाले आहेत.

अवश्य वाचा – निगडी एक्सप्रेसच्या धडाक्यासमोर टीम इंडिया कोलमडली, भारताचा १३५ धावांनी पराभव

भारताच्या दुसऱ्या डावात २७ व्या षटकामध्ये पार्थिव पटेलने वन-डाऊन पोजीशनच्या दिशेने फटका खेळून धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. यावेळी पुजारा-पटेल जोडीने दोन धावा काढून पूर्ण केल्या. मात्र तिसरी धाव घेतान चेतेश्वर पुजारा एबी डिव्हीलियर्सच्या अचूक फेकीवर बाद झाला. पुजाराच्या अशा पद्धतीने बाद होण्यावर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ड्रेसिंग रुममधून आपली नाराजी व्यक्त केली.

सेंच्युरिअन कसोटीत भारताचं क्षेत्ररक्षण हे सुमार दर्जाचं पहायला मिळालेलं आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन्ही डावात काही सोपे झेल टाकत गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. त्यामुळे आगामी कसोटीत आपल अस्तित्व टिकवण्यासाठी विराट कोहली भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. या मालिकेतली तिसरी कसोटी २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.