दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन भारताविरुद्धची उर्वरित मालिका खेळू शकणार नाहीये. भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत टाचेला झालेल्या दुखापतीमुळे डेल स्टेनला डॉक्टरांनी ५ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन करणाऱ्या डेल स्टेन आणि दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

भारताविरुद्ध पहिल्या डावात आपलं १८ वं षटक टाकत असताना स्टेनच्या टाचेला दुखापत झाली. यानंतर संघ व्यवस्थापनाने स्टेनला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची एमआरआय चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्या डावात स्टेन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र भारताविरुद्ध पुढील दोन कसोटींसाठी स्टेन खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

अवश्य वाचा – केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ‘या’ ७ विक्रमांची नोंद

पहिल्या डावात डेल स्टेनने ५१ धावांमध्ये दोन गड्यांना माघारी धाडलं. यामुळे डेल स्टेनच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये ४१९ बळी जमा झालेले आहेत. स्टेन सध्या दक्षिण आफ्रिकेतील सर्वात जास्त कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी ३ विकेट दूर आहे. स्टेनच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉक असून त्याच्या नावावर ४२२ बळी जमा आहेत.