दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी आतापर्यंत सर्वांच्या समोर आलेली आहे. केप टाऊन आणि सेंच्युरिअन कसोटीत भारतीय फलंदाज आफ्रिकेच्या माऱ्यासमोर पुरते कोलमडले. जोहान्सबर्ग कसोटीतही पहिल्या डावात भारताचे सलामीवीर माघारी परतले. अशा परिस्थितीत भारताचे माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ भारतीय संघाच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत. आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील फलंदाजांनी आपलं फुटवर्क सुधारणं गरजेचं असल्याचं मोहिंदर अमरनाथ यांनी म्हणलं आहे.

“क्रिकेटमध्ये काही गोष्टींना पर्याय नसतो. बाहेरच्या देशांमध्ये खेळताना फलंदाजीची शैली, फुटवर्क या गोष्टी उच्च दर्जाच्या असणं गरजेचं असतं. कोणत्याही फलंदाजात हे मुलभूत गुण असले की आत्मविश्वासाच्या जोरावर तो एक मोठी भागीदारी रचू शकतो.” अमरनाथ यांनी भारतीय संघाला फलंदाजीबद्दल काही टिप्स दिल्या.

अवश्य वाचा – इंग्लंडमध्ये धावा काढल्या तरच विराट कोहलीला सर्वोत्तम मानता येईल – मायकल होल्डींग

आपल्या काळात मधल्या फळीत खेळणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर ११ कसोटी शतकांचा समावेश आहे. यापैकी ९ शतकं अमरनाथ यांनी परदेशात लगावलेली आहेत. आफ्रिका दौऱ्यात भारताच्या फलंदाजीविषयी बोलताना अमरनाथ म्हणाले,” दोन कसोटी सामन्यांमध्ये तुम्ही भारतीय फलंदाजांचं निरीक्षण केलंत तर सर्व फलंदाज हे छातीवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी बॅटची कड लागून स्लिपमध्ये झेल जाण्याची संधी असते. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी चेंडूवर त्वरित प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. मात्र भारतीय फलंदाज चेंडू बॅटवर येण्याची वाट पाहत राहतात. या शैलीत लवकरात लवकर बदल होणं गरजेचं असल्याचंही,” अमरनाथ यांनी स्पष्ट केलं.