सलामीवीर शिखर धवनचं शतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली खंबीर साथ या जोरावर भारताने चौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९० धावांचं आव्हान ठेवलं आहे. शिखर आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली, यावेळी भारताची धावगती पाहता भारत सामन्यात ३०० चा आकडा पार करेलं असं वाटतं होतं. मात्र शिखर आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी सामन्यात पुन्हा एकदा हाराकिरी केली. अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे भारताने २८९ धावांपर्यंत मजल मारली. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटामुळे पंचांना काही क्षणासाठी सामना थांबवावा लागला. मात्र यानंतर सामना सुरु झाल्यानंर भारतीय डाव कोलमडला. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या या फलंदाजांना आजच्या सामन्यातही अपयशाचा सामना करावा लागला.

सामन्यात एककाळ आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला २८९ धावांमध्ये रोखण्याचं महत्वाचं काम आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलं. विजेच्या व्यत्ययानंतर खेळाला सुरुवात झाली, त्यानंतर आफ्रिकन जलदगती गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारताचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि लुंगी एन्डिगीने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्याला ख्रिस मॉरिस आणि मॉर्ने मॉर्कलने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. मात्र कर्णधार एडन मार्क्रम माघारी परतल्यानंतर सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. यानंतर पाऊस थांबल्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी करत डकवर्थ लुईस नियमांनुसार आफ्रिकेसमोर २८ षटकांत २०२ धावांचं आव्हान दिलं. सुरुवातीला हे आव्हान आफ्रिकेला पेलवणार नाही असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. कुलदीप यादव, चहल यांनी आफ्रिकेला काही धक्केही दिले, मात्र मिलर-कार्लसन जोडीने अर्धशतकी भागीदारी रचत आफ्रिकेला विजयाच्या नजिक आणून ठेवलं. यानंतर फेलिक्वायोने अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

  • डकवर्थ लुईस नियमांनूसार आफ्रिका चौथ्या वन-डे सामन्यात ५ गडी राखून विजयी
  • फेलुक्वायोची अखेरच्या षटकांत फटकेबाजी, आफ्रिका विजयाच्या जवळ
  • डेव्हिड मिलरला माघारी धाडण्यात भारताला यश, आफ्रिकेचा पाचवा गडी माघारी
  •  मिलर – कार्लसन जोडीची फटकेबाजी, आफ्रिकेचं सामन्यातलं आव्हान कायम
  • मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत तो चेंडू नो बॉल असल्याचं समोर, मिलरला जीवदान
  • युझवेंद्र चहलने उडवला डेव्हिड मिलरचा त्रिफळा
  • एबी डिव्हीलियर्स माघारी, हार्दिक पांड्याचा आफ्रिकेला चौथा धक्का
  • सीमारेषेवर भुवनेश्वर कुमारने पकडला झेल, आफ्रिकेचा तिसरा गडी माघारी
  • कुलदीप यादवचा आफ्रिकेला आणखी एक धक्का, हाशिम आमला माघारी
  • हाशिम आमला आणि डिव्हीलियर्सकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
  • आफ्रिकेला दुसरा धक्का, ड्युमिनी बाद
  • पावसाचा खेळ थांबला, आफ्रिकेसमोर २०२ धावांचं आव्हान
  • सामन्यात पुन्हा एकदा पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा व्यत्यय, पंचांनी खेळ थांबवला
  • कर्णधार एडन मार्क्रमला माघारी धाडण्यात जसप्रीत बुमराहला यश, आफ्रिकेला पहिला धक्का
  • आफ्रिकेच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २९० धावांची गरज
  • ५० षटकात भारताची मजल २८९/७ धावसंख्येपर्यंत
  • अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमार धावबाद, भारताला सातवा धक्का
  • हार्दिक पांड्या माघारी, भारताला सहावा धक्का
  • श्रेयस अय्यर माघारी, लुंगी एन्गिडीचा भारताला पाचवा धक्का
  • अजिंक्य रहाणेलाही माघारी धाडण्यात आफ्रिकेला यश, भारताचा चौथा गडी माघारी
  • मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्सकडे झेल देत शिखर धवन माघारी
  • अखेर शिखर धवनला बाद करण्यात आफ्रिकेला यश, भारताला तिसरा धक्का
  • विजांच्या व्यत्ययानंतर खेळाला सुरुवात, शिखर धवनचं शतक
  • कडाडणाऱ्या वीजेमुळे पंचांनी सामना थांबवला
  • ३५ व्या षटकात भारताने ओलांडला २०० धावसंख्येचा टप्पा
  • शंभराव्या वन-डे सामन्यात शिखर धवनचं शतक
  • शिखर धवनचं आक्रमक शतक, भारताची वाटचाल मोठ्या धावसंख्येकडे
  • भारताला दुसरा धक्का, ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर ७५ धावा काढून मिलरकडे दिला झेल
  • अखेर भारताची जोडी फोडण्यात आफ्रिकेला यश, विराट कोहली बाद
  • दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी
  • शिखर धवन – विराट कोहलीच्या फलंदाजीपुढे आफ्रिकन गोलंदाज हतबल
  • कर्णधार विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म कायम, शिखरपाठोपाठ कोहलीचंही अर्धशतक
  • शिखर धवनचं अर्धशतक, भारताने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • शिखर – विराटमध्ये ५० धावांची भागीदारी
  • भारताची धावसंख्या ५० धावसंख्येच्या पार
  • शिखर धवन-विराट कोहली जोडीने भारताचा डाव सावरला
  • कगिसो रबाडाने आपल्याच गोलंदाजीवर पकडला रोहितचा सुरेख झेल
  • भारताला पहिला धक्का, सलामीवीर रोहित शर्मा बाद
  •  भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • एबी डिव्हीलियर्सचं दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन
  • केदार जाधवच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय