X

वन-डे मालिकेत भारताची विजयी आघाडी, पाचव्या सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी

कुलदीपचे सामन्यात ४ बळी

मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे भारताला पाचव्या वन-डे सामन्यात मोठी धावसंख्या गाठता आली नाहीये. एका क्षणाला भारत ३०० ची धावसंख्या गाठेल असं वाटत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला २७४ धावांवर रोखलं. सलामीवीर रोहित शर्माला आजच्या सामन्यात सूर सापडला, आफ्रिकेच्या माऱ्याला तोंड देत रोहितने आजच्या सामन्यात शतकी खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. मात्र रोहितसोबत चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य आणि कर्णधार विराट कोहली धावबाद होऊन माघारी परतले. यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत भागीदारी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहित माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ४ बळी घेत भारताची मधली फळी कापून काढली. कगिसो रबाडाला सामन्यात १ बळी मिळाला. चौथा सामना जिंकून आफ्रिकेने मालिकेत आपलं आव्हान अद्यापही कायम ठेवलं आहे. त्यातचं पाचव्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात आफ्रिकेला यश आलं.

सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग सहज करतील असं वाटलं होतं. मात्र हाशिम आमलाचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. आमला आणि मार्क्रम या जोडीने आफ्रिकेच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र मार्क्रम माघारी परतल्यानंतर आफ्रिकेच्या संघाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीत डेव्हिड मिलर आणि यष्टीरक्षक क्लासेन यांनी आमलाची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र या तीनही फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर उरलेल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळून सामन्यात ७३ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ६ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

First Published on: February 13, 2018 4:07 pm
  • Tags: 5th-odi, India Tour of South Africa 2018,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain