कर्णधार विराट कोहलीचं वन-डे क्रिकेटमधल्या ३५ व्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर अखेरच्या वन-डे सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ६ वन-डे सामन्यांची मालिका ५-१ च्या फरकाने जिंकली आहे. आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं २०५ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विराटने आपल्या नेहमीच्या लयीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत आपल्या ३५ व्या शतकाला गवसणी घातली. विराटला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अखेरच्या वन-डे सामन्यातही पुरता कोलमडला. शार्दुलने सामन्यात ४ बळी घेत कर्णधार विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला.  चांगली सुरुवात झाल्यानंतर शार्दुल ठाकूरने आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि एडन मार्क्रम या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं. यानंतर अडचणीत सापडलेल्या आफ्रिका संघाला एबी डिव्हीलियर्स आणि खाया झोंडोच्या भागीदारीने तारलं. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र युझवेंद्र चहलने डिव्हीलियर्सचा त्रिफळा उडवला आणि आफ्रिकेची जमलेली जोडी फुटली. यानंतर आफ्रिकेचा एकही फलंदाज भारतीय आक्रमणासमोर तग धरु शकला नाही.

मात्र खाया झोंडोने एका बाजूने झुंज सुरु ठेवत आंतरराष्ट्रीय सामन्यातलं पहिलं अर्धशतक झळकावलं. भारताकडून शार्दुल ठाकूरने ४ बळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. त्याला जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने २-२ तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. वन-डे मालिका विजयानंतर भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष असणार आहे.

  • अखेरच्या सामन्यातही भारत ८ गडी राखून विजयी, मालिका ५-१ च्या फरकाने खिशात
  • अखेर विराट कोहली – अजिंक्य रहाणे जोडीकडून विजयाची औपचारिकता पूर्ण
  • कोहलीचं वन-डे क्रिकेटमधलं ३५ वं शतक, भारत विजयाच्या जवळ
  • दुसऱ्या बाजूने विराटची आक्रमक फलंदाजी, इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर झळकावलं शतक
  • विराट – अजिंक्यने पुन्हा भारतीय डावाला आकार दिला, अजिंक्यची संयमी फलंदाजी
  • विराट कोहलीचं सामन्यात अर्धशतक, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • एन्गिडीच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, भारताचा दुसरा गडी माघारी
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी
  • शिखर धवन – विराट कोहलीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी, भारताला पहिला धक्का
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • आफ्रिकेचा डाव २०४ धावांमध्ये आटोपला, भारताला विजयासाठी २०५ धावांचं आव्हान
  • फेलुक्वायोला बाद करण्यात भारताला यश, शार्दुल ठाकूरचे सामन्यात ४ बळी
  • फेलुक्वायोची शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी, आफ्रिकेने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर इम्रान ताहीर माघारी, आफ्रिकेचा नववा गडी माघारी
  • अखेर पांड्याच्या गोलंदाजीवर मॉर्कल श्रेयस अय्यरकडे झेल देत माघारी
  • मॉर्ने मॉर्कलची फटकेबाजी, आफ्रिकेची धावसंख्या वाढवण्याचा केला प्रयत्न
  • अखेर झोंडोचा अडसर दूर करण्यात भारताला यश, चहलच्या गोलंदाजीवर झोंडो माघारी
  • मात्र एका बाजूने खाया झोंडोची झुंज सुरुच, भारतीय आक्रमणाचा सामना करत झळकावलं पहिलं अर्धशतक
  • आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ख्रिस मॉरिस माघारी
  • सीमारेषेवर जसप्रीत बुमराहने पकडला बेहरदीनचा झेल
  • फरहान बेहरदीन शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर माघारी
  • बुमराहच्या गोलंदाजीवर कर्णधार कोहलीकडे झेल देत क्लासेन माघारी, आफ्रिकेला चौथा धक्का
  • क्लासेन – झोंडो जोडीकडून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • युझवेंद्र चहलने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली, एबी डिव्हीलियर्स त्रिफळाचीत
  • दक्षिण आफ्रिकेने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • झोंडो – एबी डिव्हीलियर्सने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला
  • श्रेयस अय्यरने पकडला मार्क्रमचा सुरेख झेल
  • ठराविक अंतराने कर्णधार एडन मार्क्रम माघारी, शार्दुल ठाकूरचा आफ्रिकेला दुहेरी दणका
  • मात्र शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर हाशिम आमला माघारी, आफ्रिकेला पहिला धक्का
  • हाशिम आमला आणि एडन मार्क्रम जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • भारतीय संघात केवळ एक बदल, मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा
  • अखेरच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय