दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेत भारताने कसोटी क्रिकेट पाठोपाठ वन-डे क्रमवारीतही पहिलं स्थान पटकावलं आहे. आफ्रिकेविरुद्ध पाचव्या सामन्यात ७३ धावांनी विजय मिळवल्यानंतर आयसीसीने आपली ताजी आकडेवारी जाहीर केली, यात भारताला पहिलं स्थान मिळालं आहे. या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात जरी आफ्रिकेने विजय मिळवला तरीही भारताच्या पहिल्या क्रमांकाला कोणताही धोका नसल्याचंही समजतंय.

आफ्रिकेविरुद्ध ६ वन-डे सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघ वन-डे क्रमवारीत ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. तर दक्षिण आफ्रिका १२१ गुणांसह या क्रमवारीत पहिल्या स्थानावर होतं. विराट सेनेने आफ्रिकेच्या मैदानात मिळवलेला ४-१ हा मालिका विजय त्यांना क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर घेऊन येण्यासाठी फायदेशीर ठरला आहे.

अवश्य वाचा – विराट विक्रम – द.अफ्रिकेमधला भारताचा 25 वर्षांतला पहिला मालिका विजय

या मालिकेतला शेवटचा सामना जिंकल्यास भारताच्या खात्यात आणखी एक गुणाची वाढ होणार असून, आफ्रिकेच्या खात्यातला एक गुण वजा होईल. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या पाठीमागे इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ आहेत.

आयसीसीची सध्याची वन-डे क्रमवारी पुढीलप्रमाणे –

१) भारत – १२२ गुण

२) दक्षिण आफ्रिका – ११८ गुण

३) इंग्लंड – ११६ गुण

४) न्यूझीलंड – ११५ गुण

५) ऑस्ट्रेलिया – ११२ गुण

६) पाकिस्तान – ९६ गुण

७) बांगलादेश – ९० गुण

८) श्रीलंका – ८४ गुण

९) वेस्ट इंडिज – ७६ गुण

१०) अफगाणिस्तान – ५३ गुण

११) झिम्बाब्वे – ५२ गुण

१२) आयर्लंड – ४४ गुण