18 February 2019

News Flash

गाफील राहिल्यामुळे चौथ्या वन-डेत भारताचा पराभव – सुनील गावसकर

चहलच्या नो-बॉलने सामना गमावला

डेव्हिड मिलरने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला

चौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५ गडी राखून मात केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात आफ्रिकेसमोर २०२ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. आफ्रिकेच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ते आव्हान पूर्णही केलं. मात्र यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी केलेला स्वैर मारा आणि सोडलेले झेल यामुळे आफ्रिकेचा विजय आणखी सोपा झाला. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही भारताच्या या खेळावर टीका केली आहे.

अवश्य वाचा – आम्ही सामना जिंकण्याच्या योग्यतेचा खेळ केला नाही – विराट कोहली

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मात्र पंचांच्या पाहणीत तो नो-बॉल असल्याचं आढळून आलं, यामुळे मिलरला सामन्यात मोक्याच्या क्षणी जीवदान मिळालं. याचा पुरेपूर फायदा घेत मिलरने सामन्यात आफ्रिकेचा विजय सुनिश्चीत केला. “माझ्या मते चहलचा तो नो-बॉल सामन्यात आफ्रिकेसाठी निर्णायक ठरला. याआधी सामन्यात भारताचं नियंत्रण पहायला मिळतं होतं, एबी डिव्हीलियर्सलाही माघारी धाडण्यात भारतीयांना यश आलं होतं. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील आपली पकड स्वतःच सैल करुन दिली.” गावसकरांनी भारतीय गोलंदाजांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.

यादरम्यान भारताने काहीसा गाफील खेळही केला. कदाचीत मालिकेत आपण ३-० ने आघाडीवर आहोत या भावनेतून तो गाफीलपणा आलेला असावा. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. डेव्हिड मिलर आणि हेन्रिच क्लासेनने सुरेख फटकेबाजी करत आपल्या संघाची नौका पार केली. यावेळी गावसकर यांनी आफ्रिकेच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. भारताच्या याच गाफील खेळामुळे वन-डे मालिका बरोबरीत सुटण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

First Published on February 12, 2018 3:46 pm

Web Title: india tour of south africa 2018 lack of professionalism cost india 4th odi against south africa says former indian captain sunil gavaskar