केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन चांगलच टीकेचं धनी बनलं. पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि लोकेश राहुल यासारख्या खेळाडूंना राखीव खेळाडूंच्या यादीत बसवून भारताने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला संघात जागा दिली होती. यात अजिंक्य रहाणेला दिलेली विश्रांती ही सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली होती.

मात्र पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ व्यवस्थापन १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी संघात बदल करणार असल्याचं कळतंय. ‘टाइम्स ऑफ इंडियाने’ दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या कसोटीत सलामीवीर शिखर धवन ऐवजी लोकेश राहुलला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र संघ व्यवस्थापन अजुनही अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला एक संधी देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. रहाणेला पहिल्या कसोटीत जागा न मिळाल्याने अनेक माजी आफ्रिकन खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

अवश्य वाचा – रहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड

रहाणेला वगळून संघात स्थान दिलेल्या रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवनला पहिल्या कसोटी सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मात्र जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ४ गडी घेत आपली निवड सार्थ ठरवली होती. घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य रहाणेला आपला फॉर्म कायम राखता आला नव्हता. या कारणामुळे अजिंक्य रहाणेला आफ्रिकेविरुद्ध कसोटीत अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अंतिम ११ जणांमध्ये कोणाला स्थान देतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला माजी खेळाडूचा कानमंत्र