सामन्यात पावसाने दोन वेळा आणलेला व्यत्यय आणि डेव्हिड मिलरला मिळालेलं जीवदान या दोन कारणांमुळे भारताने सामना गमावल्याचं, सलामीवीर शिखर धवनने स्पष्ट केलं आहे. चौथ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकाराला लागला. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आफ्रिकेला २८ षटकात २०२ धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. जे आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत सहज पार केलं.

अवश्य वाचा – शंभराव्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी, भारताच्या ‘गब्बर’चा अनोखा विक्रम

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मिलर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला होता. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत चहलचा तो चेंडू नो बॉल असल्याचं आढळून आलं. यानंतर आणखी एकदार मिलरचा झेल भारतीय खेळाडूंनी सोडला. याचा फायदा घेत मिलरने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत आफ्रिकेला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. या क्षणानंतर भारत सामन्यात बॅकफूटला गेल्याचं धवनने म्हटलं.

“पावसाचाही आमच्या कामगिरीवर चांगलाच फरक जाणवला. आमच्या फिरकीपटूंना चेंडू वळवायला त्रास होत होता. त्यात वारंवार चेंडू ओला होत असल्याने गोष्टी अजुन बिघडत गेल्या.” पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरु करण्यात आला, यावेळी लयीत असणारी भारताची फलंदाजी कोलमडली. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरु शकले नाहीत. ज्यामुळे एका क्षणासाठी ३०० ची धावसंख्या पार करु शकेल असं वाटत असताना, भारताला २८९ धावांवर समाधान मानावं लागलं.

अवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?