सलामीवीर रोहित शर्माचं आफ्रिका दौऱ्यातलं पहिलं शतक आणि युझवेंद्र चहल – कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीने सामन्यात घेतलेल्या ६ विकेट या जोरावर, पाचव्या वन-डे सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ अशी विजयी आघाडीही घेतली आहे. नाणेफेक जिंकून आफ्रिकेने नाणेफेक जिंकून आफ्रिकेने सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिखर धवनने फटकेबाजी करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली.

अवश्य वाचा – विराट विक्रम – द.अफ्रिकेमधला भारताचा 25 वर्षांतला पहिला मालिका विजय

मात्र शिखर माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित शर्मा यांच्यात शतकी भागीदारी झाली. विराट आणि अजिंक्य रोहितसोबत चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद होऊन माघारी परतले. मात्र रोहितने एका बाजूने आपला किल्ला लढवत शतक पूर्ण केलं. कालच्या सामन्यात तब्बल १२ विक्रमांची नोंद करण्यात आली.

अवश्य वाचा – वन-डे मालिकेत भारताचा विजय, आयसीसी क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान

० – एका हंगामात रोहित शर्मा एवढे षटकार आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीयेत. २०१७-१८ या हंगामात रोहितने आतापर्यंत ५७ षटकार ठोकले आहेत. रोहितने न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलचा ५६ षटकारांचा विक्रमही मोडला.

१- आफ्रिकेत वन-डे मालिका जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ ठरली आहे. पोर्ट एलिजाबेथच्या मैदानात पहिले ५ सामने गमावल्यानंतर भारताचा या मैदानावरचा हा पहिलाच विजय ठरला.

२- एखाद्या आशियाई संघाने आफ्रिकेत वन-डे मालिका जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २०१३ साली पाकिस्तानने आफ्रिकेला वन-डे मालिकेत हरवलं होतं.

३ – वन-डे मालिकेत विराटने ४०० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

७ – विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी आतापर्यंत ७ वेळा धावबाद झाली आहे. या यादीत विराट-रोहितच्या पुढे सचिन-सौरव (९ वेळा) ही जोडी आहे.

९ – भारतीय संघाचा हा नववा मालिका विजय ठरला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजने (१९८०-१९८८) या काळात सर्वाधिक मालिका विजय मिळवलेले आहेत.

१३ – विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही जोडी या यादीत २६ भागीदाऱ्यांसह पहिल्या स्थानावर आहेत.

१५ – सलामीवीर या नात्याने रोहित शर्माचं हे १५ वं शतक ठरलं. या यादीत सचिन तेंडुलकर ४५ शतकांसह पहिल्या तर सौरव गांगुली १९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

२८ – युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध मालिकेत २८ बळी घेतले आहेत. भारतीय फिरकीपटूंसाठी ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

२६५ – भारताकडून खेळताना रोहित शर्माने तब्बल २६५ षटकार ठोकले आहेत. रोहितने यावेळी सचिनचा २६४ षटकारांचा विक्रमही मोडीत काढला. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ३३८ षटकारांसह पुढे आहे.