पहिल्या दोन कसोटीत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर भारताने जोहान्सबर्ग कसोटीत दणक्यात पुनरागमन करत आफ्रिकेला धक्का दिला. कसोटी मालिका भारताने २-१ अशी गमावली असली तरीही ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेतला पहिला वन-डे सामना जिंकत भारताने आपण या मालिकेत सहज हार मानणार नसल्याचं दाखवून दिलंय. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला बसून रोहित शर्माला संघात जागा दिल्याबद्दल मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माच्या निवडीचं समर्थन केलं आहे.

अवश्य वाचा – डरबन वन-डे सामन्यात तब्बल १४ विक्रमांची नोंद, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक

“कसोटी मालिका सुरु होण्याआधी संघ व्यवस्थापन रोहित आणि अजिंक्य यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची याबद्दल ठाम होतं. २०१७ सालात अजिंक्यचा फॉर्म चांगला नव्हता, मात्र रोहित शर्माने मागच्या वर्षात खोऱ्याने धावा ओढल्या होत्या. अजिंक्यचा खराब फॉर्म हा मैदानात नाही तर नेट्समध्ये सरावादरम्यानही जाणवत होता. रोहितने २०१७ सालात २०० पेक्षा जास्त सरासरीने धावा काढल्या होत्या तर अजिंक्यची कामगिरी आपण सर्वांनी पाहिलीच होती. मग अशावेळी एक प्रशिक्षक म्हणून मी रोहित शर्माला काय सांगणं अपेक्षित होतं?? तु कितीही चांगल्या धावा काढत असलास तरीही त्याचा इथे उपयोग होणार नाही. अशा पद्धतीने संघ निवडला जाऊ शकत नाही.” अजिंक्यच्या निवडीवरुन विराट आणि भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींनी चोख प्रत्युत्तर दिलं.

अवश्य वाचा – ‘विराट’ कोहलीची ‘अजिंक्य’ खेळी, पहिल्या वन-डे सामन्यात भारत ६ गडी राखून विजयी

अजिंक्यच्या गुणवत्तेबद्दल संघात कोणाच्याही मनात शंका नाही. तो चांगला खेळाडू आहेच. मात्र आफ्रिकेत येण्याआधी तो ३० च्या सरासरीने धावा काढत होत्या. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेचा संघ हा २०१७ सालच्या कामगिरीच्या आधारावर निवडला गेला होता. संघाला एखाद्या पराभवाचा सामना करावा लागला की लगेच लोकं टीका करतात. मात्र जेव्हा भारतीय संघ चांगली कामगिरी करतो, तेव्हा हीच लोकं मोकळ्यापणाने कौतुक करताना दिसत नाहीत. “दुसऱ्या कसोटीपर्यंत अजिंक्य सतत नेट्समध्ये सराव करत होता. यादरम्यान त्याच्यातला आत्मविश्वास परत आलेला मला जाणवला. तिकडे रोहितला पुरेशी संधी देऊनही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ही संधी साधून आम्ही जोहान्सबर्गच्या कसोटीत रोहितला विश्रांती देऊन अजिंक्य रहाणेला संघात जागा दिली, आणि आमचा विश्वास सार्थ ठरवत अजिंक्यने तिसऱ्या कसोटीत चांगली खेळी केली.” टीकाकारांच्या प्रश्नांना सडेतोड प्रत्युत्तर देत रवी शास्त्रींनी भारतीय संघाला आपला पाठींबा दर्शवला.

अवश्य वाचा – माझ्या यशात महेंद्रसिंह धोनीचा अर्धा वाटा – कुलदीप यादव