News Flash

डरबन वन-डे सामन्यात तब्बल १४ विक्रमांची नोंद, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक

मालिकेत भारत १-० ने आघाडीवर

विराट कोहली

कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत झळकावलेल्या ३३ व्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या आफ्रिकेला केवळ २६९ धावांपर्यंत मजल मारता आली. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या फिरकी माऱ्यासमोर आफ्रिकेचा संघ पुरता कोलमडला. यानंतर आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने आपला विजय निश्चीत केला. पहिल्या वन-डे सामन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १४ विक्रमांची नोंद करण्यात आली.

अवश्य वाचा – ‘विराट’ कोहलीची ‘अजिंक्य’ खेळी, पहिल्या वन-डे सामन्यात भारत ६ गडी राखून विजयी

० – विराट कोहली आणि हाशिम आमलाचा अपवाद वगळता सध्या क्रिकेट खेळत असलेल्या एकाही खेळाडूच्या नावावर मोठ्या प्रमाणात शतकाची नोंद नाहीये. कोहलीच्या नावावर आता ५४ शतकं जमा आहेत.

१ – आफ्रिकेतलं विराट कोहलीचं हे पहिलं वन-डे शतक ठरलं.

२ – वन-डे क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक शतक करणाऱ्यांच्या यादीत विराटच्या पुढे अवघे २ खेळाडू आहेत. रिकी पाँटींगने कर्णधार या नात्याने २२ तर एबी डिव्हीलियर्सने १३ शतकं ठोकली आहेत. कोहलीच्या नावावर कर्णधार या नात्याने ११ शतकं जमा आहेत.

३ – ९ देशांमध्ये शतकं ठोकणारा विराट कोहली तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसुर्या यांनी हा कारनामा साधला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये सामना खेळला नसल्यामुळे, या देशात त्याच्या नावावर शतक जमा नाहीये. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकरला वेस्ट इंडिजमध्ये आणि सनथ जयसूर्याला झिम्बाब्वेमध्ये शतक ठोकता आलं नव्हतं.

४ – दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकाच सामन्यात शतक ठोकण्याची ही चौथी वेळ ठरली. २०१३ साली विल्यम पोर्टरफिल्ड आणि इयॉन मॉर्गन या कर्णधारांनी पहिल्यांदा असा विक्रम केला होता.

५ – सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतर वन-डे सामन्यात सलग ५ सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा अजिंक्य रहाणे तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

५ – रोहित शर्माला वन-डे सामन्यात बाद करण्याची मॉर्ने मॉर्कलची ही पाचवी वेळ ठरली. आतापर्यंत रोहितला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजच्या नावावर आहे, मॅथ्यूजने रोहितला तब्बल ७ वेळा बाद केलं आहे.

११ – कर्णधार म्हणून विराट कोहलीने झळकावलेलं हे अकरावं शतक ठरलं. यासोबत विराटने सौरव गांगुलीच्या कर्णधार म्हणून झळकावलेल्या ११ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१७ – घरच्या मैदानावर सलग १७ वा सामना जिंकण्याची दक्षिण आफ्रिकेची शृखंला काल भारताने डरबनच्या मैदानावर खंडीत केली.

१८ – धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नावावर १८ शतकांची नोंद करण्यात आलेली आहे.

४४ – धावसंख्येचा पाठलाग करताना नाबाद राहण्याची महेंद्रसिंह धोनीची ही ४४ वेळ ठरली.

१८९ – तिसऱ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीमध्ये झालेली १८९ धावांची भागीदारी, ही भारतासाठी आफ्रिकेतली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.

२६८ – डरबनच्या मैदानात याआधी ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेने दिलेलं २६८ धावांचं आव्हान सहज परतवून लावलं होतं. भारताने काल २७० धावांचा पाठलाग करत हा विक्रमही मोडला.

२७४ – आफ्रिकेच्या मैदानात भारताने केलेला २७० धावांचा पाठलाग हा त्यांचा दुसरा सर्वोत्तम पाठलाग ठरला आहे. याआधी २००३ साली झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरिअनच्या मैदानात भारताने २७४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 11:11 am

Web Title: india tour of south africa 2018 these 14 records were made and broken in 1st odi in durban
Next Stories
1 मुंबईत रंगणाऱ्या फेडरेशन चषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
2 भारत-पाकिस्तान हॉकीच्या मैदानात पुन्हा भिडणार, आशियाई चॅम्पियन्स करंडकात रंगणार सामना
3 विराटसोबत चोरटी धाव घेताना शिखर धवन बाद, ट्विटरवर हास्यकल्लोळ
Just Now!
X