दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णीत राहिला असला, तरी या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे, असे भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने सांगितले. ‘‘या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना खेळपट्टीपासून गोलंदाजांना साथ मिळत होती, तरीही आम्ही आत्मविश्वासाने खेळ केला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पहिल्या डावात खेळत असताना आमच्या गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी नव्हती, तरीही आमच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करीत त्यांच्यावर नियंत्रण ठेवले,’’ असे पुजाराने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीप्रसंगी पोषक वातावरण होते.
शेवटच्या दिवशी खेळपट्टीवरील भेगांचा आम्हाला अपेक्षेइतका फायदा मिळाला नाही, तरीही आम्ही शेवटच्या सत्रात सामन्याला कलाटणी देऊ शकलो. नशिबानेच त्यांना तारले. ए बी डी व्हिलियर्स व फॅफ डय़ू प्लेसिस यांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीनेच आफ्रिकेचा पराभव टळला. तथापि, या सामन्यातील कामगिरीमुळे आमचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचा फायदा आम्हाला पुढच्या कसोटीसाठी उपयुक्त ठरणार आहे.’’
टीकेमुळे स्टेन त्रस्त -डी व्हिलियर्स
‘‘पहिल्या कसोटीत आम्हाला हातातोंडाशी आलेला विजय मिळविता आला नाही, त्याला जबाबदार धरून प्रेक्षकांनी व प्रसारमाध्यमांनी डेल स्टेन याच्यावर टीका केली. त्यामुळे स्टेनला नैराश्य आले. स्टेनसारख्या अनुभवी खेळाडूला विनाकारण जबाबदार धरण्यात आले आहे. स्टेन व व्हर्नन फिलँडर यांच्यावर या टीकेमुळे खूप ताण आला आहे, मात्र मी त्यांच्या पाठिशी आहे. ही कसोटी अनेकांच्या स्मरणात राहील,’’ असे ए बी डी व्हिलियर्सने सांगितले.