18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Ind vs SL 3rd Test Kandy Day 2 Updates : श्रीलंकेचा पाय खोलात, दुसऱ्या डावातही थरंगा माघारी

भारत vs श्रीलंका, लाईव्ह अपडेट्स

लोकसत्ता टीम | Updated: August 13, 2017 5:36 PM

तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेसमोर डावाच्या पराभवाचं संकट समोर आलेलं आहे. भारताने दिलेल्या ४८७ धावांचा पाठलाग करताना लंकेचा पहिला डाव १३५ धावांमध्ये आटोपला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या डावातही लंकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाहीये. पहिल्या डावाप्रमाणे सलामीवीर उपुल थरंगा उमेश यादवच्या गोलंदाजाीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंकेच्या पुष्पकुमाराने आपल्या संघाची अधीक पडझड होऊ दिली नाही. दिवसाच्या अखेरीस लंकेने आपल्या दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या आहेत.

त्याआधी पहिल्या डावात श्रीलंकेची अवस्था दयनीय झाली. पहिल्या डावात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा प्रतिकार केला नाही. सर्वात आधी श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद शमीने यष्टीरक्षक साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडत थरंगाला माघारी धाडलं. पाठोपाठ दिमुथ करुणरत्नेही शमीच्या गोलंदाजीवर साहाकडे झेल देत माघारी परतला.  यानंतर दिनेश चंडीमल आणि कुशल मेंडीस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विन आणि कुलदीप यादवने दाखवलेल्या समयसुचकतेमुळे कुशल मेंडीस धावबाद झाला आणि लंकेला तिसरा धक्का बसला. यानंतर लगेचच दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने अँजलो मॅथ्यूजला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला.

मात्र यानंतर निरोशन डिकवेला आणि दिनेश चंडीमल यांनी लंकेच्या डावाला काहीसं स्थैर्य दिलं. डिकवेलाने काही सुंदर फटके खेळत संघावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी लंकेच्या डावाला स्थैर्य देणार असं वाटत असतानाच कुलदीप यादवने आधी निरोशन डिकवेला आणि नंतर दिलरुवान पेरेराला माघारी धाडत लंकेला सहावा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने मलिंदा पुष्पकुमारा आणि विश्वा फर्नांडोचा त्रिफळा उडवत श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली. त्याआधी रविचंद्रन अश्विनने लंकेकडून एकाकी झुंज देणाऱ्या कर्णधार दिनेश चंडीमलला माघारी धाडलं. यानंतर रविचंद्रन अश्विनने शेवटच्या फलंदाजाला माघारी धाडत लंकेचा डाव १३५ धावांमध्ये गुंडाळला.

भारताकडून तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्वात कुलदीप यादवने सर्वाधीक ४ बळी घेतले. त्याला मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने २-२ बळी घेत चांगली साथ दिली. तर हार्दीक पांड्यानेही १ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

त्याआधी सकाळच्या सत्रात दमदार पुनरागमन केलेल्या श्रीलंकन गोलंदाजांवर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा कुरघोडी केली. हार्दिक पांड्याने झंजावाती खेळी करत कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक साजरं केलं. ८ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने पांड्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.  हार्दीक पांड्या आणि कुलदीप यादवने अर्धशतकी भागीदारी करत संघाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दोघांनीही आठव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे श्रीलंकेचा संघ सामन्यात पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला. कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीला आपल्या गोलंदाजीवर बाद करत लक्षन संदकनने भारताला धक्के दिले, मात्र तोपर्यंत भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. मात्र त्यानंतर तळातल्या उमेश यादवला हाताशी धरुन पांड्याने चौफेर फटकेबाजी करत आपलं शतक साजरं केलं. मात्र लंच टाईमनंतर हार्दीक पांड्या लक्षन संदकनच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला आणि भारताचा डाव अखेर ४८७ धावांवर संपुष्टात आला. हार्दिक पांड्याने १०८ धावांची खेळी केली.

पहिल्या दिवशी भारताचे ६ गडी माघारी धाडण्यात श्रीलंकेला यश आलं होतं. त्यामुळे चांगली सुरुवात केलेल्या भारतीय संघाला पहिल्या दिवसाच्या अखेरीस ६ गड्यांच्या मोबदल्यात ३२९ धावाच करता आल्या. आज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला सातवा धक्का दिला आहे. यष्टीरक्षक वृद्धीमान साहा विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या आव्हानाचा कसा सामना करतो हे पहावं लागणार आहे.

श्रीलंकेकडून लक्षन संदकनने सर्वाधीक ५ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला विश्वा फर्नांडोने ३, मलिंदा पुष्पुकुमाराने २ तर लहिरु कुमाराने १ बळी घेत चांगली साथ दिली. मात्र श्रीलंकेचे गोलंदाज भारताच्या तळातल्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे अखेरच्या कसोटीतही लंकेसमोरचं आव्हान हे कठीण होणार आहे.

 • दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेचा दुसरा डाव १९/१
 • लंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळती, थरंगा उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत
 • शेवटच्या फलंदाजाला बाद करत अश्विनने श्रीलंकेचा डाव १३५ धावांवर गुंडाळला, भारताचा लंकेला फॉलोऑन
 • कुलदीप यादवच्या जाळ्यात तळातले फलंदाज अडकले, लंकेचे ९ गडी माघारी
 • श्रीलंकेकडून कर्णधार दिनेश चंडीमलची एकाकी झुंज, मात्र अश्विनच्या गोलंदाजीवर चंडीमल बाद
 • पाठोपाठ दिलरुवान पेरेरा कुलदीपच्या गोलंदाजीवर पांड्याकडे झेल देत माघारी
 • मात्र डिकवेलाला माघारी धाडत कुलदीप यादवचा लंकेला ५ वा धक्का
 • श्रीलंकेकडून पाचव्या विकेटसाठी निरोशन डिकवेला आणि दिनेश चंडीमलची अर्धशतकी भागीदारी
 • चहापानापर्यंत श्रीलंका ६१/४
 • पाठोपाठ हार्दीक पांड्याचा श्रीलंकेला चौथा धक्का, अँजलो मॅथ्यूज भोपळा न फोडता माघारी
 • मात्र अश्विन आणि कुलदीप यादवच्या समयसुचकतेच्या जोरावर कुशल मेंडीस धावबाद, लंकेला तिसरा धक्का
 • कर्णधार चंडीमल आणि कुशल मेंडीसकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • सलग तिसऱ्या कसोटीत लंकेच्या डावाची खराब सुरुवात, थरंगा स्वस्तात माघारी
 • भारताचा पहिला डाव ४८७ धावांवर आटोपला
 • लंच टाईमनंतर लगेचच हार्दीक पांड्या लक्षन संदकनच्या गोलंदाजीवर बाद
 • दुसऱ्या दिवशी लंच टाईमपर्यंत भारत ४८७/९
 • मात्र तळातल्या उमेश यादवला सोबत घेऊन पांड्याची पुन्हा अर्धशतकी भागीदारी
 • पांड्या आणि मोहम्मद शमीला माघारी धाडण्यात लंकेच्या गोलंदाजांना यश
 • हार्दीक पांड्याची मैदानात चौफेर फटकेबाजी, तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन केलं शतक साजरं
 • कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याची अर्धशतकी भागीदारी, भारताने ओलांडला ४०० धावांचा टप्पा
 • सुरुवातीच्या सत्रात श्रीलंकेचा भारताला सातवा धक्का, वृद्धीमान साहा विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर बाद
 • ३२९/६ धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

First Published on August 13, 2017 10:56 am

Web Title: india tour of sri lanka 2017 3rd test kandy day 2 live updates