भारताविरुद्ध गॉल कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान श्रीलंकेच्या अडचणींमध्ये वाढ झालेली दिसत आहे. कारण श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज सुरज लकमल दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर गेला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीवर पाणी सोडावं लागणार आहे. सुरज लकमल पहिल्या कसोटीत अंतिम ११ च्या संघात खेळला नव्हता, मात्र संघातला जलदती गोलंदाज जायबंदी झाल्यामुळे लंकेच्या अडचणींमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे.

गॉल कसोटीत शिखर धवनचा झेल पकडताना असेला गुणरत्ने जायबंदी झाल्यामुळे श्रीलंकेचा संघ १० खेळाडूंनी मैदानात उतरला होता. त्यातचं कर्णधार रंगना हेरथही आपल्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला नव्हता. श्रीलंकेसाठी एकमेव आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या कसोटी बाहेर गेलेला दिनेश चंडीमल हा आता तंदुरुस्त झाला असून तो दुसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचं कळतंय. मात्र रंगना हेरथच्या दुखापतीबद्दल अद्यापही नेमकी माहिती कळू शकलेली नाहीये.

खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेने लहिरु थिरीमनेला संघात पाचारण केलं आहे. मात्र त्याला संघात जागा मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे. पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना पत्करावा लागल्यानंतर श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरी कसोटी ३ ऑगस्टपासून कोलंबोच्या मैदानात सुरु होतेय. त्यामुळे घरच्या मैदानात श्रीलंका मालिका पराभव टाळू शकते का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – ३ महिन्यांमध्ये टीम इंडिया खेळणार २३ सामने