श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने लंकेवर ९ गडी राखून मात केली आहे. शिखर धवनचं शतक आणि आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने श्रीलंकेवर मात करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताच्या डावाचा हिरो ठरला तो सलामीवीर शिखर धवन, त्याने केवळ ९० चेंडुंमध्ये १३२ धावांची खेळी केली. त्याच्या या आक्रमक खेळीत तब्बल २० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सलामीवीर रोहीत शर्मा झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनला दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. कोहलीने आज अर्धशतक झळकावत ८२ धावांची खेळी केली. कोहलीने आपल्या खेळीत १० चौकार आणि एका षटकार लगावला.

श्रीलंकेची गोलंदाजी आजच्या सामन्यात पूर्णपणे हतबल ठरली. लसिथ मलिंगा, विश्वा फर्नांडा, अँजलो मॅथ्यूज यापैकी कोणालाही भारताच्या फलंदाजांना आव्हान देता आलं नाही. दुसऱ्या डावात सामन्याच्या सुरुवातीला भारताच्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. सलामीवीर रोहीत शर्मा अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. चमार कपुगेदराच्या अचुक फेकीवर तो धावबाद झाला. शिखर धवनने काही आक्रमक फटके खेळत भारतीय डावाची चांगली सुरुवात केली मात्र रोहीत शर्मा आज अडखळत खेळताना दिसला. अखेर चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद होऊन माघारी परतला.

त्याआधी कसोटी मालिक्रेप्रमाणे पहिल्या वन-डे सामन्यातही श्रीलंकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच राहिली. भारताविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या मेहनतीवर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी अक्षरशः पाणी फिरवलं. अर्धशतकवीर निरोशन डिकवेला माघारी परतल्यानंतर एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिलं, त्यामुळे लंकेचा संघ सामन्यात मोठी धावसंख्या उभारुच शकला नाही.

चांगली सुरुवात झाल्यानंतरही फॉर्मात आलेल्या श्रीलंकन फलंदाजीला पुन्हा एकदा धक्का देण्यात भारताचे गोलंदाज यशस्वी ठरले. अर्धशतकवीर निरोशन डिकवेलाला केदार जाधवने माघारी धाडलं. डिकवेलाने दुसऱ्या विकेटसाठी कुशल मेंडीससोबत ६५ धावांची भागीदारी केली. भारतीय आक्रमणाचा नेटाने सामना करत निरोशन डिकवेलाने आपलं अर्धशतकही पुर्ण केलं. त्याने ६४ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. डिकवेला आज मोठी खेळी करुन लंकेला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच केदार जाधवने त्याला माघारी धाडलं. पाठोपाठ अक्षर पटेलने कुशल मेंडीसचा त्रिफळा उडवत लंकेला तिसरा धक्का दिला.

यानंतर श्रीलंकेचा एकही फलंदाज मैदानावर फारकाळ तग धरु शकला नाही. मोठे फटके खेळण्याच्या नादात लंकेच्या फलंदाजांनी आपल्या विकेट भारतीय गोलंदाजांना अक्षरशः बहाल केल्या. लसिथ मलिंगा आणि अँजलो मॅथ्यूजने शेवटच्या क्षणांमध्ये थोडी फटकेबाजी केल्यामुळे लंकेला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला, नाहीतर पहिल्या सामन्यात लंकेची अवस्था आणखी बिकट झाली असती.

त्याआधी लंकेने आपल्या डावाची सुरुवात चांगली केली होती. दोन्ही सलामीवीरांमध्ये ७४ धावांची भागीदारीही झाली होती. मात्र धनुष्का गुणथिलका युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात गुणथिलकाने लोकेश राहुलकडे झेल दिला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठीही लंकेच्या फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी झाली. मात्र त्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे लंकेने सामन्यावरची आपली पकड गमावली.

भारताकडून अक्षर पटेलने ३ बळी घेतले, त्याला केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी २ बळी घेत चांगली साथ दिली.

  • पहिल्या वन-डेत भारत अखेर विजयी, लंकेवर ९ गडी राखत मात, मालिकेत १-० ने आघाडी
  • कर्णधार विराट कोहलीचीही अर्धशतक झळकावत धवनला उत्तम साथ, लंकेचे गोलंदाज हतबल
  • कोहली आणि धवनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी, शिखर धवनचं धडाकेबाज शतक
  • धवनचा कसोटी पाठोपाठ वन-डे क्रिकेटमध्येही धडाका सुरुच, पहिल्याच वन-डेत आक्रमक अर्धशतक
  • मात्र धवन-कोहलीची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, भारताचा डाव सावरला
  • मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात रोहीत शर्मा माघारी, भारताला पहिला धक्का
  • रोहीत शर्मा आणि शिखर धवनकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
  • लंकेचा पहिला डाव २१६ धावांवर आटोपला, भारतासमोर २१७ धावांचं आव्हान
  • लंकेच्या मधल्या फळीतले फलंदाज ठरले हजेरीवीर, लागोपाठ अंतराने विकेट पडत गेल्याने लंकेची अवस्था बिकट
  • पाठोपाठ अक्षर पटेलने उडवला कुशल मेंडीसचा त्रिफळा, लंकेला तिसरा धक्का, भारताचं सामन्यात पुनरागमन
  • लंकेला दुसरा धक्का, केदार जाधवच्या गोलंदाजीवर डिकवेला माघारी
  • ८ चौकारांच्या सहाय्याने निरोशन डिकवेलाचं झुंजार अर्धशतक
  • डिकवेलाची कुशल मेंडीसला हाताशी धरत दुसऱ्या विकेटसाठी पुन्हा अर्धशतकी भागीदारी
  • चहलने लंकेची जमलेली जोडी फोडली, गुणथिलकाला माघारी धाडत लंकेला पहिला धक्का
  • डिकवेला आणि गुणथिलकाची पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • डिकवेला आणि गुणथलिकाची लंकेकडून सावध सुरुवात
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय