रोहीत शर्माने केलेलं शतक आणि त्याला महेंद्रसिंह धोनीने अर्धशतक करुन दिलेली खंबीर साथ या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेवर ६ गडी राखून मात केली आहे. आघाडीचे ४ फलंदाज लवकर माघारी परतले असताना रोहीत शर्माने एकाबाजूने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करत १२४ धावांची शतकी खेळी केली. महेंद्रसिंह धोनीने ६६ धावा करत त्याला चांगली साथ दिली.  रोहीत शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीने पाचव्या विकेटसाठी १५७ धावांची नाबाद दीडशतकी भागीदारी केली. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवणं कठीण होऊन बसलं.

मात्र भारताचा विजय जवळ आलेला पाहताच मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी पाण्याच्या बाटल्या फेकत आपला रोष व्यक्त केला. हा प्रकार पाहताच मैदानात उपस्थित पंचांनी खेळ थांबवलेला आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेच्या पोलिस दलातील ब्लॅक कमांडोंनी मैदानात फेरी मारत बाटल्या फेकणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढलं. त्यानंतर काहीवेळाने सामना पुन्हा सुरु करण्यात आला. यानंतर रोहीत शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीने विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ८ धावा झटपट काढत तिसऱ्या सामन्यासह वन-डे मालिकाही आपल्या खिशात घातली.

त्याआधी श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवातही काहीशी अडखळती झालेली आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनला श्रीलंकेचा जलगदती गोलंदाज लसिथ मलिंगाने माघारी धाडलं आहे. अवघ्या ५ धावांवर मलिंगाने धवनचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताला सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच धक्के देण्यात लंकेचा संघ यशस्वी झालाय. यानंतर रोहीत शर्माचा अपवाद वगळता एकही खेळाडू मैदानावर टीकला नाही. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांना ठराविक अंतराने माघारी धाडत अकिला धनंजयने भारताची अवस्था बिकट करुन टाकली. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला धक्के देत सामन्यात पुनरागमन केलं होतं. त्यामुळे या सामन्यात लंकेचा संघ असाच काहीसा चमत्कार करतो का हे पहावं लागणार आहे.

श्रीलंकेकडून अकिला धनंजयने २ तर लसिथ मलिंगा आणि विश्वा फर्नांडोने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोत तिसऱ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेची अवस्था बिकट झालेली पहायला मिळाली. ५० षटकांनंतर श्रीलंकेने आपले ९ गडी गमावत २१७ धावा केल्या. आता हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारताला २१८ धावा कराव्या लागणार आहेत. लहिरु थिरीमनेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने मैदानावर टिकून भारतीय गोलंदाजीचा दीर्घकाळ सामना केला नाही. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरु असतानाच थिरीमनेने लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला माघारी धाडण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं. केदार जाधवकडे झेल देत तो माघारी परतला. थिरीमनने ८० धावांची खेळी केली. यापाठोपाठ थोड्याच अंतराने श्रीलंकेचा कर्णधार चमार कपुगेदरा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर जसप्रीत बुमराहने अकिला धनंजयाचा त्रिफळा उडवत लंकेला बॅकफूटवर ढकललं.

पहिले दोन गडी झटपट माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव आता रुळावर येणार असं वाटत असतानाच भारताने श्रीलंकेला तिसरा धक्का दिला आहे. दिनेश चंडीमल हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराहकडे झेल देत माघारी परतला. त्याने ३६ धावांची खेळी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले दोन फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर चंडीमल आणि थिरीमनने तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या भागादीरामुळे लंकेचा धावफलक हा शंभरीपार गेला आहे.  अँजलो मॅथ्यूजनेही एका बाजूने थिरीमनेला चांगली साथ दिली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्येही ३८ धावांची भागीदारी झाली. मात्र विराट कोहलीने गोलंदाजीत बदल करत केदार जाधवला गोलंदाजी दिली. रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात मॅथ्यूज केदार जाधवच्या जाळ्यात सापडला आणि पायचीत होऊन माघारी परतला.

त्याआधी सावध सुरुवात केलेल्या श्रीलंकेच्या संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एका षटकात डिकवेला आऊट असल्याचा पंचांनी निर्णय दिला. ज्याला श्रीलंकेच्या फलंदाजांनी आव्हान दिलं, ज्यात तिसऱ्या पंचांकडून डिकवेलाला नाबाद ठरवलं. मात्र त्यानंतर लगेच त्याच षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या यॉर्कर बॉलवर डिकवेलाला माघारी धाडलं. यावेळी पंचांनी डिकवेलाला नाबाद ठरवलं, ज्याला भारतीय गोलंदाजांनी आव्हान दिलं असता रिप्लेमध्ये डिकवेला हा आऊट असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे यावेळी तिसऱ्या पंचांनी डिकवेलाला बाद ठरवलं आणि लंकेला पहिला धक्का बसला. पाठोपाठ कुशल मेंडीसलाही स्लिपमध्ये रोहीत शर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडत, श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने श्रीलंकेच्या ५ तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि केदार जाधवने प्रत्येकी एका फलंदाजांना माघारी धाडलंय.

  • विजयासाठी हल्या असलेल्या ८ धावा भारतीयांकडून पूर्ण, वन-डे मालिकेत भारत ३-० ने आघाडीवर
  • पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढलं, सामन्याला परत सुरुवात
  • लंकेच्या प्रेक्षकांची अखिलाडूवृत्ती, पराभव समोर दिसताच मैदानात पाण्याच्या बाटल्या फेकल्या.
  • रोहीत शर्माने एका बाजूने संघाची बाजू सांभाळात शतक ठोकलं, धोनीचीही रोहीतला उत्तम साथ
  • रोहीत शर्मा, महेंद्रसिंह धोनीची अभेद्य शतकी भागीदारी
  • मात्र अकिल धनंजयचे भारताला पुन्हा दणके, लागोपाठ लोकेश राहुल, केदार जाधवला माघारी धाडत भारताला बॅकफूटवर ढकललं
  • रोहीत शर्मा, लोकेश राहुलकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • भारताला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी
  • भारताच्या डावाची सुरुवात अडखळती, सलामीवीर धवन माघारी
  • श्रीलंकेचं भारतासमोर २१८ धावांचं आव्हान
  • यानंतर एकही फलंदाज मैदानावर तग धरुन राहिला नाही, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात लंकेला अपयश
  • बुमराहने उडवला अकिला धनंजयचा त्रिफळा, लंकेचे ७ गडी माघारी
  • एकामागोमाग एक बळी जाण्याचं सत्र सुरुच, कर्णधार कपुगेदरा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद
  • मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या नादात केदार जाधवकडे झेल देत थिरीमने माघारी
  • लहिरु थिरीमनेची एका बाजूने झुंज सुरुच
  • मात्र मॅथ्यूजला माघारी धाडत केदार जाधवने श्रीलंकेला चौथा धक्का दिला
  • चौथ्या विकेटसाठी थिरीमनेची मॅथ्यूजबरोबर भागीदारी
  • लहिरु थिरीमनेकडून आश्वासक खेळी, अर्धशतकामुळे लंकेचा डाव सावरला
  • मात्र थोड्याच वेळात दिनेश चंडीमल बुमराहकडे झेल देत माघारी, लंकेला तिसरा धक्का
  • लंकेचा डाव सावरला, धावसंख्या शंभरीपार
  • तिसऱ्या विकेटसाठी चंडीमल आणि थिरीमने यांच्यात अर्धशतकी भागीदारी
  • जसप्रीत बुमराहचा श्रीलंकेला दुसरा धक्का, कुशल मेंडीस बाद
  • मात्र त्याच षटकात बुमराहने डिकवेलाला पायचीत करत माघारी धाडलं
  • जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर डिकवेलाला जीवदान, तिसऱ्या पंचांचा निर्णय डिकवेलाच्या बाजूने
  • लंकेच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • लंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय