गॉल, कोलंबो पाठोपाठ कँडीचं मैदान मारत भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. कँडी कसोटीत पहिल्या डावात श्रीलंकेच्या संघाला अवघ्या १३५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने तिसऱ्या दिवशीच श्रीलंकेचा दुसरा डावही १८१ धावांवर संपुष्टात आणला. काही ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही श्रीलंकन फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा साधा प्रतिकारही केला नाही. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सामन्यावर वर्चस्व गाजवायला आणखीनचं मदत झाली.

दिवसाच्या सुरुवातीला काही मिनीटांमध्येच रविचंद्रन अश्विनने दिमुथ करुणरत्नेला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेच्या हाती झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. यानंतर मोहम्मद शमीने  श्रीलंकेला पुन्हा २ धक्के दिले. शमीने लंकेचा नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारालाही मैदानावर फारकाळ टिकू दिलं नाही. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडत शमीने लंकेला धक्का दिला. यापाठोपाठ  कुशल मेंडीस शमीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. त्यामुळे लंकेची अवस्था सामन्यात काहीशी बिकट झालेली पहायला मिळाली.

मात्र यानंतर कर्णधार दिनेश चंडीमलने अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या डावासा स्थैर्य आलं. मात्र चंडीमलला बाद करत कुलदीपने श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. कर्णधार चंडीमल माघारी परतल्यानंतर रविचंद्रन अश्विनने अँजलो मॅथ्यूजलाही माघारी धाडलं लंकेला सहावा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने दिलरुवान पेरेराही माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था अधिकच बिकट झालेली पहायला मिळते आहे. यानंतर श्रीलंकेच्या तळातला एकही फलंदाज मैदानात जास्तवेळ तग धरु शकला नाही.

भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने लंकेच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला मोहम्मद शमीने ३, उमेश यादवने २ तर कुलदीप यादवने १ विकेट घेत चांगली साथ दिली. संपूर्ण मालिकेत एकाही सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारताला प्रतिकार केला नाही, त्यामुळे ही मालिका काहीशी एकतर्फी झालेली पहायला मिळाली. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेत श्रीलंकेचा संघ भारताला कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

  • तिसऱ्या कसोटीत विजयासह भारताने मालिका ३-० ने जिंकली
  • दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनचे ४ बळी, शमीची ३ बळी घेत अश्विनला चांगली साथ
  • लंकेचे तळातले फलंदाज ठरले हजेरीबहाद्दर, दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संघ १८१ धावांमध्ये गारद झाला
  • लंकेला सातवा धक्का, दिलरुवान पेरेरा माघारी
  • लागोपाठ रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज माघारी
  • मात्र कुलदीप यादवने लंकेची जमलेली जोडी फोडली, कर्णधार चंडीमल माघारी
  • चंडीमल-मॅथ्यूजची पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी
  • तिसऱ्या दिवशी लंच टाईमपर्यंत श्रीलंका ८२/४
  • कर्णधार चंडीमल आणि अअँजलो मॅथ्यूजची भागीदारी, लंकेचा डाव सावरला
  • मोहम्मद शमीचा लंकेचा चौथा धक्का, कुशल मेंडीसला धाडलं माघारी
  • लंकेचा नाईट वॉचमन पुष्पकुमाराही बाद, भारत विजयापासून ७ विकेट दूर
  • सुरुवातीत्या काही मिनीटांमध्येच लंकेला दुसरा धक्का, करुणरत्ने अश्विनच्या गोलंदाजीवर माघारी
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात