कसोटी आणि वन-डे मालिके प्रमाणे एकमेव टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात केली आहे. श्रीलंकेने दिलेलं १७१ धावांचं लक्ष्य भारताने ७ गडी राखून पूर्ण केलं आहे. विराट कोहली भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने ८२ धावांची खेळी केली. सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर मनीष पांडेने त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. मात्र विजयासाठी १० धावा हव्या असताना कोहली मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मनीष पांडेनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी या सामन्यातही निराशा केली. लसिथ मलिंगा, प्रसन्ना आणि उदाना या गोलंदाजांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवला. मात्र इतर गोलंदाजांना विराट कोहलीच्या फटकेबाजीचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताने एका दौऱ्यात प्रतिस्पर्धी संघाला कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यात पराभूत करुन अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे.

  • विजयाची औपचारिकता पांडे आणि धोनीकडून पूर्ण, भारताची लंकेवर ७ गडी राखून मात
  •  विजयासाठी १० धावा हव्या असताना कोहली माघारी. कोहलीच्या सामन्यात ८२ धावा
  • दुसऱ्या बाजूने मनीष पांडेची कोहलीला चांगली साथ
  • श्रीलंकेच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत, विराट कोहलीचं अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरीपार
  • कर्णधार विराट कोहलीची एका बाजुने झुंज सुरुच
  • मात्र सेक्कुगे प्रसन्नाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल झेलबाद
  • लोकेश राहुल आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला
  • मात्र रोहीत शर्माला माघारी धाडण्यात लंकेला यश, लसिथ मलिंगाने धाडलं माघारी
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात, लोकेश राहुलची चांगली फटकेबाजी
  • तळातल्या फलंदाजांची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी, भारतासमोर १७१ धावांचं आव्हान
  • कुलदीप यादवचा श्रीलंकेला सातवा धक्का
  • चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेला निम्मा संघ माघारी, भारत सामन्यात वरचढ
  • थिसारा परेरा, दसुन शंका या फलंदाजांना माघारी धाडत चहलचा श्रीलंकेला पुन्हा धक्का
  • मात्र ५३ धावांवर मुनवीराचा त्रिफळा उडवत कुलदीप यादवचा श्रीलंकेला चौथा धक्का
  • २६ चेंडुंमध्ये मुनवीराचं अर्धशतक
  • मुनवीराचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल, भारताच्या फिरकीपटूंवर जोरदार आक्रमण
  • मात्र एका बाजूने विकेट जाण्याचं सत्र सुरुच, अँजलो मॅथ्यूज यष्टीचीत, लंकेला तिसरा धक्का
  • वन-डे, कसोटी मालिकेच्या तुलनेत लंकेच्या फलंदाजांची आक्रमक फलंदाजी
  • डिकवेलाचा त्रिफळा उडवत बुमराहचा श्रीलंकेला दुसरा धक्का
  • निरोशन डिकवेला आणि मुनवीराची फटकेबाजी सुरुच, भारतीय गोलंदाजांवर लंकेचा हल्ला
  • मात्र भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, कर्णधार थरंगाला धाडलं माघारी
  • श्रीलंकेकडून डावाची आक्रमक सुरुवात, थरंगा आणि डिकवेलाची फटकेबाजी
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर