भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्याआधी संघाला एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर मुरली विजय दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. मुरली विजयच्या जागी शिखर धवनला संघात स्थान देण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मुरली विजयच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र संपूर्ण मालिका विजय त्या दुखापतीसह खेळला होता. आगामी श्रीलंका दौरा डोळ्यासमोर ठेऊन विजयने आयपीएलच्या दहाव्या मोसमातही न खेळण्याचा निर्णय घेतला होता. महिनाभराच्या कालावधीत विजयच्या हातावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली होती.

विजयच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने नेमकं स्पष्टीकरण दिलं नसलं तरीही विजयच्या जुन्याच दुखापतीने पुन्हा तोंड वर काढलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. विजय संघाबाहेर गेल्यामुळे आता सलामीची जबाबदारी साहजीकपणे शिखर धवनच्या खांद्यावर येणार आहे. मात्र शिखर धवन गेले अनेक महिने कसोटी सामने खेळत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत भारत आता या समस्येतून कसा मार्ग काढतो ते पहावं लागणार आहे.