गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेवर आपली पकड मजबूत केली आहे. श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे. ६०० धावांचं मोठं आव्हान ठेवल्यानंतर मोहम्मद शमीने श्रीलंकेची आघाडीची फळी कापून काढली. त्याला उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने १-१ बळी घेत चांगली साथ दिली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी लवकरात लवकर श्रीलंकेच्या संघाला बाद करुन त्यांना बॅकफूटवर ढकलण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या खेळात अनेक विक्रम मोडले गेले तर अनेक नवीन विक्रमांची नोंदही झाली. काय आहेत हे विक्रम, एकदा नजर टाकूयात..

– श्रीलंकेत कसोटीदरम्यान पहिल्या दोन दिवसांमध्ये पहिल्यांदाच ३५० पेक्षा जास्त धावा काढल्या गेल्या.

– श्रीलंकेच्या नुवान प्रदीपच्या नावावर पहिल्यांदाच एका डाळात ५ पेक्षा जास्त बळी घेण्याचा विक्रम, आपल्या २५ व्या कसोटीत प्रदीपने हा विक्रम साधलाय.

– घरच्या मैदानात १ बळी मिळवण्यासाठी १०० पेक्षा जास्त धावा मोजण्याची रंगना हेरथची ही दुसरी वेळ, याआधी पाकिस्तानविरुद्ध २००० साली हेरथने १०० पेक्षा जास्त धावा मोजल्या होत्या.

– एका डावात सर्वाधीक धावा देणारा रंगना हेरथ तिसरा कर्णधार ठरला.

– आठव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकावणारा हार्दिक पांड्या चौथा भारतीय फलंदाज ठरला.

– गेल्या वर्षभरात ६०० किंवा ६०० पेक्षा अधिक धावा करण्याची भारतीय संघाची पाचवी वेळ.

– कसोटीत १५० पेक्षा अधिक धावा करण्याची चेतेश्वर पुजाराची सहावी वेळ.

– घरच्या मैदानाबाहेर खेळताना भारताने केलेली नववी सर्वाधीक धावसंख्या. चेन्नई कसोटी इंग्लंडविरुद्ध ७५९-७ ही कसोटीमधली आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

१८ – २०१४ पासून श्रीलंकेचे १८ खेळाडू धावचीत झाले आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तानला पाठीमागे टाकत श्रीलंकेचा संघाच्या नावे हा आगळा वेगळा विक्रम

३६ – पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी १ बळी घेत रविचंद्रन अश्विनने रिचर्ड हेडली यांच्या नावे असणारा ३६ वर्षांचा विक्रम मोडला. ५० कसोटींमध्ये हेडलीयांनी २६२ बळी घेतले. तर अश्विनने ४९ कसोटींमध्येच २७५ बळी घेतले आहेत.