कोलंबो कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत भारताकडून पहिल्या डावात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी केल्या. तर गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात तर रविंद्र जाडेजाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली.

श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात गडगडला, मात्र दुसऱ्या डावात दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीसच्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेने भारताचा काही प्रमाणात नेटाने सामना केला. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने श्रीलंकेला डावाचा पराभव सहन करावा लागला.

या सामन्यात आजच्या काही नवीन विक्रमांची नोंद करण्यात आली.

– श्रीलंकेत दोन मालिका विजय मिळवणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला

– दोन खेळाडूंनी एकाच सामन्यात ५ बळी आणि अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

– अश्विन आणि जाडेजाने मिळून श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात १०० पेक्षा जास्त धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

– फॉलोऑन स्विकारल्यानंतर २ शतकं करणारा दिमुथ करुणरत्ने हा पहिलाच श्रीलंकन फलंदाज ठरला. फॉलोऑन मिळाल्यानंतर एकाच डावात श्रीलंकेच्या दोन खेळाडूंनी शतकं ठोकण्याची ही पहिली वेळ ठरली.

– कोलंबोच्या मैदानात भारताचा हा तिसरा विजय ठरला. वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्येही भारताने ३ विजय मिळवले आहेत.

– भारताचा श्रीलंकेतला हा चौथा मालिका विजय ठरला. यासोबत भारताने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमासोबत बरोबरी केली.

– न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा अपवाद वगळता भारताने ७ देशांमध्ये कसोटीत डावाने मालिका विजय संपादन केला आहे.

– भारताचा हा कसोटीमधला सलग आठवा विजय ठरलाय. सलग विजयांच्या यादीत सध्या भारत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.

– ५ बळी घेण्याची रविंद्र जाडेजाची ही कसोटी क्रिकेटमधली नववी वेळ ठरली.

१६ – कोलंबो कसोटीत एकूण १६ षटकार मारले गेले, श्रीलंकेत एका कसोटी सामन्यात मारले गेलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत.

२९ – आतापर्यंत मालिकेत २९ षटकारांची नोद, श्रीलंकेत एका मालिकेत मारले गेलेले सर्वाधिक षटकार ठरले आहेत.

५० – ३९ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेंनी घेतलेल्या झेलांचं अर्धशतक. एकनाथ सोलकर यांच्यानंतर अजिंक्य रहाणे हा विक्रम करणारा दुसरा खेळाडू ठरलाय. सोलकर यांनी २६ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता.