भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ वनडे आणि ३ टी-२० मालिका खेळवण्यात येईल. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. १३ जुलै ते २५ जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेसमोर उभी असेल. करोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.

भारताचे श्रीलंकेसोबतचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनच्या हातात भारतीय संघाची कमान असू शकते. शिवाय, मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिकरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सूर्यकुमारने पदार्पण करत आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती.

हेही वाचा – टी-१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचं २८ चेंडूत शतक, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना पळव पळव पळवलं!

नवीन खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी

या दौऱ्यासाठी काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळू शकते. यात चेतन साकारिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आगामी टी-२० वर्ल्डकपला समोर ठेऊन निवडकर्ते या दौऱ्याकडे आणि खेळाडूंकडे लक्ष ठेवणार आहेत.

श्रीलंका दौरा सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांना इंग्लंडमध्ये खेळायची आहे.

हेही वाचा – आयपीएल २०२१पूर्वी दोन मुंबईकर क्रिकेटपटूंचा ‘खास’ व्हिडिओ होतोय व्हायरल!

भारताचा श्रीलंका दौरा

वनडे मालिका –

  • १३ जुलै – पहिला वनडे सामना
  • १६ जुलै – दुसरा वनडे सामना
  • १८ जुलै – तिसरा वनडे सामना

टी-२० मालिका –

  • २१ जुलै – पहिला टी-२० सामना
  • २३ जुलै – दुसरा टी-२० सामना
  • २५ जुलै – तिसरा टी-२० सामना