वेस्ट इंडिजविरुद्ध अँटीग्वा येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड बसवली आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने ३ गडी गमावत १८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्याच्या घडीला भारताकडे २६० धावांची भक्कम आघाडी आहे. त्यामुळे आजच्या खेळात भारतीय फलंदाज किती धावांची भर घालतात हे पहावं लागणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत भारताचं पारड वर ठेवलं आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांवर गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. इशांत शर्माने वेस्ट इंडिजचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेत चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात मधल्या फळीमध्ये रोस्टन चेस आणि अखेरच्या फळीत शेमरॉन हेटमायर आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. पहिल्या डावात भारताने विंडीजवर ७५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.

पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आश्वासक खेळ केला. तरीही सलामीवीर मयांक अग्रवालला झटपट माघारी धाडण्यात विंडीज यशस्वी ठरलं. फिरकीपटू रोस्टन चेसने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने ते ही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मोह टाळत खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे भर दिला. ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला पहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद ५१ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५३ धावांवर खेळत होता. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात आतापर्यंत रोस्टन चेसने २ तर केमार रोचने १ बळी घेतला.