कर्णधार विराट कोहलीचं नाबाद शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरने त्याला दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-० च्या फरकाने जिंकली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात नाबाद ११४ तर श्रेयस अय्यरने ६५ धावांची खेळी केली.
वेस्ट इंडिजला २४० धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी २५५ धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात धाव घेताना उडालेल्या गोंधळामुळे रोहित धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. फॅबिअन अॅलनने एकाच षटकात शिखर आणि पंतला झटपट माघारी धाडत भारताला धक्का दिला.
यानंतर मैदानात आलेल्या मुंबईकर श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. दुसऱ्या वन-डे सामन्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंनी शतकी भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस आणि विराटने फटकेबाजी करत धावांचा ओघ सतत सुरु ठेवला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. केमार रोचच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना श्रेयस अय्यर ६५ धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवच्या साथीने आपल्या ४३ व्या शतकाची नोंद केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा भारतीय जोडीने सहज पूर्ण करत वन-डे मालिकेवर कब्जा केला.
त्याआधी, पावसाने व्यत्यय आणलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजने २४० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला.
अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. अखेरीस चहलने लुईसला माघारी धाडत विंडीजची जोडी फोडली. मात्र गेलने भारतीय गोलंदाजांचा सामना करत आक्रमक अर्धशतक झळकावलं. खलिल अहमदने गेलला माघारी धाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला.
यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर दोन्ही संघातले खेळाडू मैदानात आले. भारतीय गोलंदाजांनी पावसानंतरच्या वातावरणाचा फायदा उचलत विंडीजच्या फलंदाजांना बॅकफूटला ढकललं. शिमरॉन हेटमायर, शाई होप यांना ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डरने फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला, मात्र ते देखील आपल्या संघाला मोठा टप्पा गाठून देऊ शकले नाहीत. भारताकडून खलिल अहमदने ३ बळी घेतले. त्याला मोहम्मद शमीने २ तर युजवेंद्र चहल आणि रविंद्र जाडेजा यांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.
टी-२० मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही भारताची २-० ने बाजी
कोहलीचं वन-डे कारकिर्दीतलं ४३ वं शतक
शिखर धवन-पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरची विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी, दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केली अर्धशतकं
अखेरीस केमार रोचच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर ६५ धावा काढून जेसन होल्डरकडे झेल देऊन माघारी
शिखर धवन आणि ऋषभ पंतला धाडलं माघारी
रोहित धावबाद, सलामीची जोडी फुटली
खलिल अहमद-मोहम्मद शमीचा भेदक मारा
उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात ब्रेथवेट यष्टीरक्षक पंतकडे झेल देऊन माघारी
खलिल अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहलीकडे झेल देत होल्डर माघारी
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मनिष पांडेने घेतला झेल
दरम्यानच्या काळात विंडीजने ओलांडला २०० धावांचा टप्पा
रविंद्र जाडेजाने उडवला होपचा त्रिफळा
मोहम्मद शमीने घेतला बळी
मोठी धावसंख्या गाठण्याचं विंडीजच्या फलंदाजांसमोर आव्हान
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अखेरीस पावसाने थोडी उसंत घेतली आहे. खेळपट्टीच्या पाहणीसाठी पंच मैदानावर
२० ते २२ षटकांचा सामना खेळवला जाण्याची शक्यता
२२ षटकांनतर वेस्ट इंडिज १५८/२
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना लुईस झेलबाद
ठराविक अंतराने ख्रिस गेलही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देत माघारी, विंडीजला दुसरा धक्का
अखेरच्या वन-डे सामन्यात ख्रिस गेलचा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ, ४१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावांची खेळी
ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आहे
सलामीवीर ख्रिस गेलचं अर्धशतक
या मालिकेतला पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता
अखेरच्या सामन्यात कुलदीप यादवला विश्रांती देत युजवेंद्र चहलला संघात स्थान