वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर बाजी मारली आहे. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. मात्र यजमान संघ हे लक्ष्य पार करु शकला नाही. अखेरीस भारताने २२ धावांनी सामन्यात बाजी मारली. भारताकडून कृणाल पांड्याने २ तर वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमारने १-१ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. मात्र त्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. मधल्या फळीतले फलंदाज अपेक्षेप्रमाणे धावा जोडू शकले नाहीत. विंडीजकडून थॉमस-कॉट्रेल जोडीने अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा केला.

अवश्य वाचा – Ind vs WI : ख्रिस गेलला धोबीपछाड देत रोहित ठरला टी-२० मध्ये षटकारांचा बादशहा

रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी पाहता भारत मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र किमो पॉलने शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराटच्या साथीने काहीकाळ डाव सावरला. यादरम्यान रोहितने आपलं अर्धशतकही साजरं केलं. मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली.

यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. ऋषभ पंतही सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. थॉमसच्या गोलंदाजीवर पोलार्डकडे झेल देत पंत माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात कॉट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मनिष पांडेही झेलबाद होऊन माघारी परतल्यामुळे मोक्याच्या क्षणी भारत धावा जमवू शकला नाही. अखेरीस कृणाल पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. वेस्ट इंडिजकडून ओश्ने थॉमस, शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी २-२ तर किमो पॉलने एक बळी घेतला.

Live Blog

00:07 (IST)05 Aug 2019
डकवर्थ लुईस नियमानुसार भारताची सामन्यात बाजी

२२ धावांनी मिळवला विजय, मालिकेतही २-० ने आघाडी

23:11 (IST)04 Aug 2019
सामना काहीकाळ थांबवण्यात आला आहे

फ्लोरिडाच्या मैदानावर काळ्या ढगांनी गर्दी केल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत स्थानिक वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार यादरम्यान वीज पडण्याची शक्यताही आहे...खबरदारीचा उपाय म्हणून सामना थांबवण्यात आला आहे.

अखेर फ्लोरिडाच्या मैदानात पावसाला सुरुवात

22:59 (IST)04 Aug 2019
त्याच षटकात रोव्हमन पॉवेल माघारी

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पॉवेल पायचीत, विंडीजला चौथा धक्का

पॉवेलची ३४ चेंडूत ५४ धावांची खेळी, अर्धशतकी खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश

22:57 (IST)04 Aug 2019
विंडीजची जमलेली जोडी फुटली, पूरन माघारी

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना पूरन सीमारेषेवर मनिष पांडेच्या हाती झेल देऊन माघारी

22:56 (IST)04 Aug 2019
निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेलने वेस्ट इंडिजचा डाव सावरला

तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांची ७६ धावांची भागीदारी, पॉवेलचं अर्धशतक

22:07 (IST)04 Aug 2019
सुनिल नरिन माघारी, विंडीजला दुसरा धक्का

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात नरिन त्रिफळाचीत

22:03 (IST)04 Aug 2019
विंडीजला पहिला धक्का, एविन लुईस माघारी

भुवनेश्वर कुमारने आपल्याच गोलंदाजीवर घेतला झेल

21:43 (IST)04 Aug 2019
कृणाल पांड्याची अखेरच्या षटकांत फटकेबाजी, भारताची १६७ धावांपर्यंत मजल

वेस्ट इंडिजला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान

21:23 (IST)04 Aug 2019
विराट कोहली त्रिफळाचीत, भारताला चौथा धक्का

शेल्टन कोट्रेलने घेतला भारतीय कर्णधाराचा बळी

मनिष पांडेही झटपट माघारी

21:16 (IST)04 Aug 2019
सलग दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत अपयशी

पोलार्डच्या हाती झेल देऊन पंत माघारी. ऑश्ने थॉमसचा दुसरा बळी

21:15 (IST)04 Aug 2019
रोहित शर्मा माघारी, भारताला दुसरा धक्का

५१ चेंडूत ६७ धावांची खेळी करत रोहित शर्मा माघारी, थॉमसने घेतला बळी

21:02 (IST)04 Aug 2019
रोहित शर्माचं अर्धशतक

विंडीजच्या गोलंदाजांचा रोहितकडून समाचार, भारताने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा

21:01 (IST)04 Aug 2019
भारताची जमलेली जोडी फोडण्यात विंडीजला यश

किमो पॉलच्या गोलंदाजीवर शिखर धवन त्रिफळाचीत होऊन माघारी

20:34 (IST)04 Aug 2019
रोहित शर्मा - शिखर धवन जोडीची आक्रमक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी केली अर्धशतकी भागीदारी

19:44 (IST)04 Aug 2019
असा असेल वेस्ट इंडिजचा अंतिम ११ जणांचा संघ
19:44 (IST)04 Aug 2019
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ
19:42 (IST)04 Aug 2019
सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकली

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारतीय संघात कोणताही बदल नाही