टेन स्पोर्ट्स या प्रक्षेपण वाहिनीशी असलेल्या वादाचा फटका भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याला बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि टेन स्पोर्ट्स यांच्यातील तिढा सुटू न शकल्याने भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हा दौरा रद्द होण्यासाठीचे अधिकृत कारण भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडूंना आलेला थकवा असे दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
झिम्बाब्वे दौऱ्याच्या प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्ट्स या वाहिनीकडे होते. ही वाहिनी झी-एस्सेल समूहाचा भाग आहे. या समूहाने बीसीसीआयच्या इंडियन प्रीमिअर लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला समांतर स्पर्धा सुरू करण्याचा घाट घातला आहे. या कारणामुळेच बीसीसीआय आणि टेन स्पोर्ट्स यांच्यात वाद निर्माण झाला. झिम्बाब्वेमधील मालिकांच्या प्रक्षेपणाचे अधिकार टेन स्पोर्ट्सकडेच आहेत. या कारणामुळे बीसीसीआयने मालिका खेळण्यासंदर्भात नापसंती व्यक्त केली होती.
‘झिम्बाब्वे क्रिकेट’ने या मुद्यावर बीसीसीआयशी चर्चा करत तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रक्षेपणाचे अधिकार टेन स्पोर्ट्सकडेच राहतील हे निश्चित असल्याने बीसीसीआय दौरा रद्द करण्याचा निर्णयाप्रत आल्याचे समजते.
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. आता पुढच्या वर्षी हा दौरा होण्याची शक्यता आहे.