भारतीय युवा संघाचा दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून विजय

ईस्ट लंडन : प्रतिभावान डावखुरा फलंदाज दिव्यांश सक्सेनाने (नाबाद ८६) साकारलेल्या दिमाखदार अर्धशतकाला तिलक वर्मा (५९) आणि कुमार कुशाग्र (नाबाद ४३) यांची अप्रतिम साथ लाभल्यामुळे भारतीय संघाने (१९ वर्षांखालील) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नऊ गडी आणि ४५ चेंडू राखून यश संपादन केले.

या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. आफ्रिकेने दिलेले १८८ धावांचे माफक लक्ष्य भारताने अवघ्या एका फलंदाजाच्या मोबदल्यात ४२.३ षटकांत गाठले. दिव्यांश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना लेगस्पिनर रवी बिश्नोईने मिळवलेल्या तीन बळींच्या जोरावर भारताने आफ्रिकेचा डाव १८७ धावांत गुंडाळला. ल्युक ब्युफॉर्ट (६४) आणि जॅक लीगस (२७) यांनी आफ्रिकेतर्फे झुंजार खेळ केला.

प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वालच्या अनुपस्थितीत सलामीला संधी मिळालेल्या मुंबईकर दिव्यांशने अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश करताना पहिल्या गडय़ासाठी तिलकसह १२७ धावांची भागीदारी रचली. तिलक बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कुशाग्रच्या साथीने दिव्यांशने भारताचा विजय साकारला. दिव्यांशने ११ चौकारांसह नाबाद ८६, तर कुशाग्रने सहा चौकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

’ दक्षिण आफ्रिका : ४८.३ षटकांत सर्व बाद १८७ (ल्युक ब्युफॉर्ट ६४, जॅक लीगस २७; रवी बिश्नोई ३/३६) पराभूत वि. ’ भारत : ४२.३ षटकांत १ बाद १९० (दिव्यांश सक्सेना नाबाद ८६, तिलक वर्मा ५९, कुमार कुशाग्र नाबाद ४३; अ‍ॅकिल कोल्टे १/४२)

’ सामनावीर : दिव्यांश सक्सेना.