इंग्लंडविरुद्ध खेळविण्यात येणारया दोन सामन्यांसाठीच्या भारताच्या १९ वर्षाखालील संघाची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर येत्या १३ फेब्रुवारी रोजी पहिला, तर २१ फेब्रुवारी रोजी दुसरा सामना खेळविण्यात येणार आहे. दोन्ही सामना चार दिवसीय असणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्त्व जॉन्टी सिद्धू याच्याकडे देण्यात आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

नुकतेच विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडच्या संघावर मात केली. त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तिसरा व निर्णायक सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय प्राप्त करून ट्नेन्टी-२० मालिका देखील खिशात टाकेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, भारताच्या राष्ट्रीय संघापाठोपाठ आता १९ वर्षाखालील संघ देखील इंग्लंडला धूळ चारणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

असा आहे १९ वर्षाखालील भारतीय संघ-
जॉन्टी सिद्धू (कर्णधार), अभिषेक गोस्वामी, रोहन कुन्नुमल, सौरव सिंग, रवी ठाकूर, उत्कर्ष सिंग, डॅरिअल फरेरो, सिद्धार्थ अक्रे, लोकेश्वर, मयंक मार्कंड, सिजोमन जोसेफ, हर्ष त्यागी, ऋषभ भगत, कानिश्क सेठ, विनीत पानवर0