विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंकेला टी-२० मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभूत केल्यानंतर….भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीवर टी-२० मालिकेत ५-० ने हरवलं. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाची कामगिरी पाहून, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी विराटची तुलना इम्रान खान यांच्याशी केली आहे.

“न्यूझीलंडमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाहून मला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाची आठवण झाली. इम्रान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने अनेकदा हातातून गमावलेला सामना खेचून आणला आहे. ज्यावेळी तुमचा स्वतःवर दृढ विश्वास असतो, त्याचवेळी हे शक्य होतं”, अशा शब्दांत मांजरेकर यांनी विराट आणि भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

याचसोबत फलंदाजी आणि यष्टीरक्षणात बहारदार कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलचंही मांजरेकर यांनी कौतुक केलं आहे. दरम्यान, भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.

भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर तर दोन्ही फलंदाजांनी ३४ धावा कुटल्या. मात्र नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.

अर्धशतकवीर सेफर्ट माघारी परतल्यानंतर, नेहमीप्रमाणेच न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. एकामागोमाग एक विकेट फेकत न्यूझीलंडने सोपं आव्हान कठीण करुन ठेवलं. टेलरने एका बाजूने बाजू सांभाळत आपलं अर्धशतक झळकावलं खरं, मात्र तो देखील सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इश सोधीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या शेपटाला फारसं वळवळण्याची संधी न देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.