कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने तब्बल १९७ धावांनी विजय प्राप्त केला. कसोटीच्या दुसऱया दिवसापर्यंत भारतीय संघ बॅकफूटवर होता. पण त्यानंतर संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर किवींना धूळ चारली. भारतीय संघाची ही ५०० वी कसोटी होती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ही ऐतिहासिक कसोटी जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. भारतीय संघाच्या विजयाची पाच कारणे…

मुरली विजय-चेतेश्वर पुजारा यांची दोन्ही डावात शतकी भागीदारी-
भारतीय संघाकडून कसोटीच्या दोन्ही डावात मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी रचली. कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचे ९ विकेट्स पडले होते. त्यानंतर दुसऱया भारताचा पहिला डाव ३१८ धावांत संपुष्टात आला होता. पहिल्या डावात पुजारा आणि मुरली विजय वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. पहिल्या डावात मुरली विजयने ६५, तर पुजाराने ६२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱया डावात दोघांनीही पुन्हा एकदा शतकी भागीदारी रचून संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱया डावात मुरली विजयने ७६ आणि पुजाराने ७८ धावा केल्या.

अश्विनच्या १० विकेट्स –
पहिला डाव ३१८ धावांत संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली होती. विल्यमसन-लॅथम जोडीने शतकी भागीदारी रचली होती. त्यामुळे ही जोडी भारतीय संघाची डोकेदुखी ठरत होती. आर.अश्विनने ही जोडी फोडून काढली. अश्विनने लॅथमला ५८ धावांवर, तर विल्यमसनचा ७५ धावांवर त्रिफळा उडवला. पहिल्या डावात अश्विनने ४ विकेट्स घेतल्या.
दुसऱया डावात अश्विनने कमाल केली. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या. अश्विनने न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच नामोहरम केले.

जडेजाची अष्टपैलू कामगिरी-
रवींद्र जडेजा भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रवींद्र जडेजाने पहिल्या डावात न्यूझीलंडच्या पाच महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. जडेजाने एकाच षटकात तीन विकेट्स घेण्याची कमाल केली. हाच भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरला. भारतीय संघाला न्यूझीलंडला २६२ धावांवर रोखण्यात यश आले आणि संघाने समाधानकारक आघाडी घेतली.
दुसऱया डावात भारतीय संघाला मजबूत आघाडी मिळवून देण्यात जडेजाने आपल्या फलंदाजीने योगदान दिले. जडेजाने मोक्याच्या क्षणी नाबाद अर्धशतकी खेळी साकारून आपल्यातील अष्टपैलू गुण सिद्ध करून दाखवले.

मोहम्मद शमीच्या मोक्याच्या क्षणी दोन विकेट्स-
कानपूरची खेळपट्टी फिरकीला पोषक असणारी असली, तरी दुसऱया डावात अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजय प्राप्त करण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांना तातडीने बाद करण्याची गरज असताना उपहारासाठी काही मिनिटांचा कालावधी असताना मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करत बी.जे.वॉल्टिंग आणि मार्क क्रेग यांना चालते केले. शमीच्या रिव्हर्स स्विंगवर वॉल्टिंगने हात टेकले, तर मार्क क्रेगला शमीने त्रिफळा उडवला.

कोहलीचे कर्णधारी कसब-
कर्णधार कोहली यावेळी आपल्या बॅटने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही, तरी त्याने एक कर्णधार म्हणून मैदानात उल्लेखनीय कामगिरी केली. पहिल्या डावात विल्यमसन आणि लॅथम जोडी मैदानात जम बसवू लागल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर कोहलीकडून गोलंदाजीत वेळोवेळी बदल केले गेले. सततच्या फिरकीपटूंच्या माऱयानंतर मध्येच फिरकीपटूला पाचारण करून किवींना संभ्रामात टाकणारी खेळी कोहलीने खेळली. याशिवाय, संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी गोलंदाजीत काही अनपेक्षित बदल देखील केले. रोहित शर्मा, मुरली विजय यांच्याकडून काही षटकं कोहलीने टाकून घेतली.