न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून; अमित मिश्राला संधी मिळण्याची शक्यता
पाचशेवी ऐतिहासिक कसोटी जिंकल्यानंतर घरच्या मैदानावर सलग विजयांची मालिका कायम राखण्यासाठी आतूर भारतीय संघाचा विजयरथ आता कोलकाता कसोटीसाठी सज्ज झाला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर दमदार कामगिरी करत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे उष्ण दमट वातावरण, फिरकीला अनुकूल खेळपटय़ा आणि दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकलेला न्यूझीलंडचा संघ चाचपडताना दिसतो आहे.
मायदेशातली २५०वी कसोटी जिंकत वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे. भक्कम फलंदाजी फळी, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाची भेदक फिरकी आणि अफलातून क्षेत्ररक्षण या बळावर भारतीय संघाने ही वाटचाल केली आहे. नव्या हंगामात भारताला १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. कानपूर कसोटी जिंकत भारतीय संघाने प्रदीर्घ हंगामाची दिमाखदार सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकणे आवश्यक आहे. कोलकाता कसोटी जिंकत क्रमवारीत अव्वल स्थानासह वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.
सलामीवीर लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी शिखर धवनला संघात परतेल. दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या गौतम गंभीरला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कसोटी प्रकारात भारताचा आधारवड झालेल्या मुरली विजयकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या विराट कोहलीला कसोटीमध्ये मात्र लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. कोलकाता कसोटीत कोहलीला उत्तम संधी आहे. चेतेश्वर पुजाराने कानपूर कसोटीत वेगाने धावा करत संघव्यवस्थापन आणि टीकाकार दोघांनाही प्रत्युत्तर दिले आहे. कानपूर कसोटीतील अपयश बाजूला सारून दमदार खेळी करण्यासाठी अजिंक्य रहाणे सज्ज आहे. पाच गोलंदाजानिशी खेळण्याचे धोरण भारतीय संघाने स्वीकारल्यास रोहित शर्माचे स्थान धोक्यात आहे. कानपूर कसोटीत पहिल्या डावात रोहित बेजबाबदार पद्धतीने बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भन्नाट फिरकीबरोबरच फलंदाजीतही योगदान दिले आहे. अश्विनच्या बोटाला दुखापत झाली आहे. मात्र तरीही तो खेळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांची फिरकीसमोर उडणारी भंबेरी लक्षात घेता अमित मिश्राला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन सराव सत्रात सहभागी झाला नाही. मात्र काळजीचे कारण नसल्याचे संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले. फिरकीपटू मार्क क्रेग दुखापतग्रस्त झाल्याने जीतन पटेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू योगदान देणारा मिचेल सँटनर न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे.
सर्वोत्तम प्रयत्न करणे माझ्या हातात आहे. प्रत्येक सामन्यात खोऱ्याने धावा होत नाहीत. खेळपट्टीच्या उसळीचा अंदाज घेण्यासाठी रबरी चेंडूवर सराव केला. खेळपट्टी चांगली आहे. अश्विनच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नाही. न्यूझीलंडच्या संघातील डावखुऱ्या फलंदाजांची संख्या लक्षात घेऊन जयंत यादवला राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. नैसर्गिक खेळाला प्राधान्य दिल्याने रवींद्र जडेजाला यश मिळाले आहे. त्याचे अष्टपैलू योगदान संघाचा समतोल संतुलित करते. – विराट कोहली, भारताचा कर्णधार
संघ
- भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, जयंत यादव, उमेश यादव.
- न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, जीतन पटेल, मार्टिन गप्तील, मॉट हेन्री, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, ल्युक राँची, मिचेल सँटनर, इश सोधी, रॉस टेलर, नील व्ॉगनर, ब्रॅडले वॉटलिंग.
दादा अडकला लिफ्टमध्ये
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली संघटनेच्या लिफ्टमध्ये अडकले. ही लिफ्ट २९ वर्षे जुनी आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट थांबली. सुरक्षारक्षकांनी तात्काळ कार्यवाही करत गांगुली यांची सुटका केली.
खेळपट्टी
या हंगामासाठी इडन गार्डन्सची खेळपट्टी १२ वर्षांनंतर नव्याने तयार करण्यात आली आहे. खेळपट्टीवर थोडेसे गवत आहे. तिसऱ्या दिवसानंतर खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देण्याची शक्यता आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे चेंडू स्विंग होण्याची शक्यता आहे.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर, वेळ : सकाळी ९.३० पासून
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 4:08 am