पाकिस्तानी क्रिकेट संघाचा फलंदाज आणि फिरकीपटू मोहम्मद हाफीज याने रविवारी स्वत:चा एक फोटो शेअर केला. सेंट लुसिया येथे थोडा निवांत वेळ घालवतानाचा त्याने फोटो टाकला. त्याने एकूण ३ फोटोंची एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली. मात्र त्यातील एका फोटोमुळे तो प्रचंड ट्रोल झाला.

सेंट लुसिया येथे काही निवांत क्षण घालवतानाची एक पोस्ट त्याने ट्विटरवर शेअर केली. त्या पोस्टमध्ये दोन फोटो हे निसर्गसौंदर्याचे तर एक त्याचा शर्टलेस फोटो होता. त्या पोस्टवर त्याने सेंट लुसियातील सूर्यास्त असे कॅप्शनदेखील दिले. पण त्या दोन फोटोंपेक्षा त्याचा वैयक्तिक शर्टलेस फोटो जास्त चर्चिला गेला.

या फोटोवरून त्याच्यावर तुफान टीका झाली. काहींनी त्याला गरीबांचा विराट कोहली असे हिणवले, तर काहींनी त्याला विराटची फोटोत नक्कल न करता फलंदाजीत नक्कल कर असा सल्ला दिला.

काही दिवसांपूर्वी विराटनेही शर्टलेस फोटो शेअर केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात निर्भेळ यश संपादन केलं. सर्वात प्रथम टी-२०, त्यानंतर वन-डे आणि अखेरीस कसोटी मालिकेतही बाजी मारत भारताने विंडीजला व्हाईटवॉश दिला. मात्र या कामगिरीनंतरही विराट कोहलीला ट्रोल व्हावं लागलं. विराटने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला ‘शर्टलेस’ फोटो याला कारणीभूत ठरला होता. त्यासारखाच प्रयत्न मोहम्मद हाफीजने केला आणि तो विराटपेक्षा अधिक ट्रोल झाला.