21 March 2019

News Flash

अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक करणार नाही – अजिंक्य रहाणे

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीत ताकद आहे - रहाणे

अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेदरम्यान

वर्षभरापूर्वी आयसीसीकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची आज मोठी परीक्षा असणार आहे. आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताविरुद्ध अफगाणिस्तानला कसोटी सामना खेळायचा आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाविरोधात खेळताना अफगाणिस्तानच्या संघावर नक्कीच दबाव असणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी पाहता, भारतीय संघही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. या कसोटीसाठी कर्णधारपद भूषवत असलेल्या अजिंक्य रहाणेनेही अशाच प्रकारचं वक्तव्य करुन आपण सामन्यासाठी तयार असल्याचं दाखवून दिलं आहे.

“आम्ही अफगाणिस्तानच्या संघाला हलकं लेखणार नाहीयोत. त्यांचा संघ चांगला आहे, विशेषकरुन त्यांच्या गोलंदाजीत ताकद आहे. क्रिकेट हा खूप मजेशीर खेळ असल्यामुळे मी कोणत्याही संघाला गृहीत धरण्याची चूक करणार नाही. मात्र मैदानात भारताचा संघ कसोटीत पहिल्या क्रमांकावर का आहे याची प्रचिती आम्ही प्रतिस्पर्धी संघाला नक्की करुन देऊ.” सामना सुरु होण्याआधी एक दिवस झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्य बोलत होता.

बंगळुरुत आम्ही काही सत्रांमध्ये चांगला सराव केला आहे. आयपीएल संपल्यानंतर पुन्हा कसोटी क्रिकेटसाठी तयार होताना खूप मजा येते आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार अझगर स्टॅनिकझाईने आपले फिरकीपटू हे भारताच्या फिरकीपटूंच्या तुलनेत सरस असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र प्रत्येक संघाला आपले खेळाडू सर्वोत्तम वाटत असतात, कुलदीप, आश्विन आणि जाडेजाकडे असलेला अनुभव आमच्यासाठी पुरेसा असल्याचं म्हणत अजिंक्यने प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या प्रश्नाला जास्त उत्तर देणं टाळलं. त्यामुळे या कसोटी सामन्यात दोन्ही संघ कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First Published on June 14, 2018 8:32 am

Web Title: india vs afghanistan we are not going to take afghanistan lightly says ajinkya rahane
टॅग Bcci