भारतीय कसोटी इतिहासावर नजर मारल्यास डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज खूप कमी पाहायला मिळतील. डाव्या हाताचे अनेक फिरकी गोलंदाज आले मात्र वेगवान गोलंदाजाची भारतीय संघावर नामुष्की राहिली आहे. आशीष नेहरा, जहीर खान आणि इरफान पठान याना भारताचे डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज म्हणून आज ओळखलं जातं. या तीन गोलंदाजानंतर २०२१ मध्ये भारतीय कसोटी संघात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचं आगमन झालं. होय… ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात टी. नटराजन यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं आहे. भारताकडून कसोटी खेळणारा तो ३०० वा क्रिकेटपटू ठरला आहे.

नटराजनआधी भारतीय संघाकडून अखेरचा कसोटी सामना खेळणारा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज जहीर खान आहे. जहीर खानने आपला अखेरचा कसोटी सामना २०१४ मध्ये न्यूझीलंड विरोधात खेळला आहे. त्यानंतर आजतागत भारतीय कसोटी संघात एकही डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज नव्हता. अखेर ब्रिस्बेनमध्ये नटराजनला दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी संधी देण्यात आली आहे.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

एकाच दौऱ्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान मिळवणारा नटराजन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नटराजन यानं भारतीय वन-डे संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर टी-२० सामन्यातही पदार्पण केलं. आता कसोटी संघात नटराजनला संधी मिळाली आहे. नटराजनला २० प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव गाठीशी आहे. गतवर्षी जानेवारीत चेपॉक मैदानावर तो रेल्वेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात त्यानं तीन बळी घेतले होते.

आणखी वाचा- सिराजच्या चेंडूवर रोहित शर्मानं घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडीओ

नेट गोलंदाज झाला कसोटी खेळाडू
वनडे आणि टी-२० मालिकेनंतर सीरिजनंतर नटराजनला नेट बॉलर म्हणून टीमसोबत ठेवण्यात आलं होतं. नटराजन रोज भारतीय बॅट्समनना नेटमध्ये सराव देत होता. पण चौथ्या टेस्टपर्यंत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, अश्विन आणि जडेजा हे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, त्यामुळे नटराजनला पदार्पणाची संधी मिळाली.