भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना असणार आहे. या कसोटीतील जय-पराजयाने मालिकेचा निकाल निश्चित होणार आहे. सध्या दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी होती. पण ऋषभ पंत, आर.अश्विन आणि हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवत कसोटी अनिर्णीत राखली. ब्रिस्बेनच्या मैदानावरील आतापर्यंतचा भारताचा इतिहास बघितला, तर आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाहीय. या मैदानावर भारतीय संघाला आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. पण तो इतिहास आहे, आणि या ताज्या नव्या दमाच्या भारतीय संघात तो इतिहास बदलण्याची क्षमता आहे.
आणखी वाचा- चौथ्या कसोटीआधी जोश हेझलवूडची टीम इंडियावर मानसिक दबाव टाकण्याची खेळी
ब्रिस्बेनची खेळपट्टी
ब्रिस्बेनची खेळपट्टी ही संतुलित समजली जाते. इथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांना यश मिळवण्याची समान संधी असते. या खेळपट्टीवर उसळते चेंडू ओळखणे फलंदाजाला फारसे जड जात नाही. फिरकी गोलंदाजालाही खेळपट्टीकडून साथ मिळू शकते.
ब्रिस्बेनमधील भारतीय संघाचा रेकॉर्ड
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावरील टीम इंडियाचा रेकॉर्ड फार उत्साहवर्धक नाहीय. गाबा ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. मागच्या काही वर्षात ताज्या दमाच्या टीम इंडियाने अनेक मैदानांवरील पूर्वइतिहासाचे आकडे बदलले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा भारतीय संघ ऐतिहासिक विजयाची नोंद करु शकतो.
ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाचा रेकॉर्ड
गाबा ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. ऑस्ट्रेलियन संघ आतापर्यंत या मैदानावर ५५ कसोटी सामने खेळलाय. त्यात ३३ कसोटीमध्ये विजय मिळवला तर फक्त आठ कसोटी सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. या मैदानावर १९८८ सालापासून ऑस्ट्रेलियाचा एकदाही पराभव झालेला नाही. १९८८ साली वेस्ट इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 4:59 pm