एक फेब्रुवारीपासून तिकीट विक्रीला सुरुवात

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ फेब्रुवारीपासून भारताचा पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू होत असून या सामन्याद्वारे पुणे शहरास खऱ्या अर्थाने कसोटी केंद्राचा दर्जा मिळणार आहे. या सामन्याच्या सीझन तिकीट विक्रीस एक फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अ‍ॅड.अभय आपटे व चिटणीस रियाझ बागवान यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष कुमार ताम्हाणे व खजिनदार विकास काकतकर हेही उपस्थित होते.

सीझन तिकीटपैकी एक तिकीट पुण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव याला देत त्याचा गौरव करण्यात आला. पीवायसी हिंदू जिमखाना, गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे तसेच ऑनलाईनद्वारे सीझन तिकीट विक्री केली जाणार आहे. दररोजच्या खेळाची तिकिटे आदल्या दिवशी उपलब्ध केली जातील.

तिकीट दर याप्रमाणे-ईस्ट व वेस्ट स्टँड-सीझन तिकीट १ हजार रुपये व प्रत्येक दिवसाचे ४०० रुपये. साउथ अप्पर ब्लॉक-सीझन-१५०० रुपये व प्रत्येक दिवसाचे ६०० रुपये, साउथ लोअर-सीझन-२५०० रुपये व प्रत्येक दिवसाचे १ हजार रुपये, साउथ वेस्ट व साइथ ईस्ट स्टँड-तसेच नॉर्थ वेस्ट व नॉर्थ ईस्ट-सीझन-२ हजार रुपये व प्रत्येक दिवसाचे ८०० रुपये, साउथ पॅव्हेलियन ‘अ’ व ‘ब’ गॅलरी-सीझन- ५ हजार रुपये व प्रत्येक दिवस-२ हजार रुपये. कापरेरेट बॉक्स-सीझन- ६२ हजार ५०० रुपये व प्रत्येक दिवसाचे ५० हजार रुपये.

एकदिवसीय लढतीद्वारे पाच कोटींची कमाई

इंग्लंड व भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्याद्वारे एमसीएला पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून त्याचा उपयोग संघटनेच्या विविध उपक्रमांकरिता केला जाणार आहे. पुण्यात प्रथमच कसोटी सामना होत असल्यामुळे त्यासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे यासाठी क्रिकेटविषयक अनेक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. कसोटी सामन्यातील रंगत शेवटच्या दिवसापर्यंत राहावी यादृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू पांडुरंग साळगांवकर यांच्या देखरेखीखाली खेळपट्टी तयार केली जाणार आहे असेही आपटे यांनी सांगितले.

  • प्रत्येक दिवशी शंभर शालेय मुलामुलींना मोफत प्रवेश
  • प्रत्येक दिवशी प्रथम श्रेणी खेळलेल्या शंभर खेळाडूंना सन्माननीय प्रवेशिका
  • प्रत्येक दिवशी २५ दिव्यांग प्रेक्षकांना मोफत प्रवेश
  • संलग्न जिल्हा संघटनांना सन्माननीय प्रवेशिका
  • माजी कसोटीपटूंचा विशेष गौरव करणार
  • माजी महिला क्रिकेटपटूंचाही गौरव होणार
  • कसोटी सामन्यानिमित्त क्रिकेटविषयक प्रदर्शन, चर्चासत्राचे आयोजन