भारताचा प्रतिभावंत सलामी फलंदाज मयांक अगरवाल गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. मयांकला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता येत नाही. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या मयांक आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिल्यांद शून्य धावसंख्येवर बाद झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत सामन्यात भारतीय संघ १९६ धावांचा पाठलाग करत आहे. सलामीसाठी उतरलेला मयांकला मिचेल स्टार्कनं शुन्य धावसंख्येवर माघारी धाडलं. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये मयांक पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला आहे.

आतापर्यंत मयांक २४ डावात कधीही शून्य धावसंख्येवर बाद झाला नव्हता. मात्र, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याच्या २५ डावांत शून्यावर बाद होण्याची वेळ आली. २६ डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातच मयांकनं आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. तर यंदा जानेवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली होती. २०१८ पासून आजतागत मयांक कधीही शून्यावर बाद झाला नव्हता.

मयांकच्या नावावर आतापर्यंत तीन शतकांची नोंद आहे. यामध्ये दोन कसोटी द्विशतकं आहेत. तर चार अर्धशतकांची नोंद आहे. मयांकला एकदिवसीय सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाच एकदिवसीय सामन्यात मयांकला फक्त ८६ धावा करता आल्यात. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२ इतकी आहे. दुसरीकडे कसोटी सामन्यात मयांकनं दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. आतापर्यंत कसोटीत तीन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या २४३ इतकी आहे.


बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मयांक स्वस्तात माघारी परतला. मयांक आणि शुबमन गिल सलामीला उतरले होते. डावाची सुरुवात करताना मयांक शून्य धावसंख्येवर पायचीत बाद झाला.