10 July 2020

News Flash

स्वत:ला सिद्ध करण्याच्या हेतूमुळेच कामगिरीत सुधारणा!

भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर डेव्हिड वॉर्नरचे स्पष्टीकरण

भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर डेव्हिड वॉर्नरचे स्पष्टीकरण

मुंबई : चेंडूत फेरफार केल्याची शिक्षा भोगून परतल्यापासून प्रत्येक लढतीत मी स्वत:ला सिद्ध करण्याच्या हेतूनेच मैदानावर उतरतो. त्यामुळेच माझी कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर दिली.

वॉर्नर (नाबाद १२८) आणि कर्णधार आरोन फिंच यांनी (नाबाद ११०) साकारलेल्या अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला १० गडी राखून सहज नेस्तनाबूत केले. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूत फेरफार केल्यामुळे वर्षभराच्या निलंबनाची शिक्षा भोगणाऱ्या वॉर्नरने मार्च २०१९ मध्ये पुनरागमन केल्यापासून सातत्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत धावांचे शिखर रचले आहे.

‘‘जे झाले त्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे पुनरागमन केल्यापासून प्रत्येक सामन्यात स्वत:च्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा कशी करता येईल, या हेतूनेच मी मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो,’’ असे ३३ वर्षीय वॉर्नर म्हणाला.

‘‘विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात मी नेमका अपयशी ठरल्याने आम्हाला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यानंतर अ‍ॅशेस मालिकेतही माझी कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र याच काळात मला माझ्या खेळातील त्रुटींची प्रकर्षांने जाणीव झाली. तेव्हापासून प्रत्येक लढतीत खेळपट्टीवर स्थिरावल्यावरच आक्रमक रूप धारण करायचे, हे मी मनाशी पक्के केले,’’ असेही वॉर्नरने सांगितले.

विचित्र गोलंदाजी शैली असणाऱ्या जसप्रीत बुमरा किंवा कुलदीप यादव यांचे चेंडू सहजतेने खेळण्यासाठी कशा प्रकारे तयारी केली, याविषयी विचारले असता वॉर्नर म्हणाला, ‘‘बुमरा हा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना पुढील चेंडू कोणता असेल, याचा तुम्हाला अंदाज येणे कठीण असते. विशेषत: डावाच्या सुरुवातीला त्याने टाकलेल्या यॉर्कर आणि उसळत्या चेंडूंनी मला हैराणसुद्धा केले. परंतु मी मन स्थिर ठेवून त्याच्याविरुद्ध अधिक धोका पत्करला नाही.’’

कधी कधी बुमराला गोलंदाजी करण्यासाठी धावत असताना पाहून मला ब्रेट ली आणि लसिथ मलिंगा यांचीही आठवण येते, असेही वॉर्नरने सांगितले. तर कुलदीपचा सक्षमपणे सामना करण्यासाठी त्याच्या मनगटावर मी काळजीपूर्वक लक्ष देतो, असे त्याने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2020 3:48 am

Web Title: india vs australia 1st odi david warner zws 70
Next Stories
1 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : पूजा दानोळेला चौथे, 
2 टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम
3 इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू दुसऱ्या फेरीत
Just Now!
X