13 December 2017

News Flash

ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंची कसोटी

भारतीय ‘अ’ संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना आजपासून

खास क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 22, 2017 2:23 PM

भारतीय ‘अ’ संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना आजपासून

भारताचा दौरा प्रत्येक संघासाठी कठीण समजला जातो, खासकरून आशिया खंडाबाहेरच्या देशांसाठी. भारतामध्ये फलंदाजी आणि फिरकीच्या जोरावर सामने जिंकता येतात. भारताची ही दोन्ही बलस्थाने. भारताचा संघही चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा दौरा आव्हानात्मक आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला एक सराव सामन्याची संधी मिळाली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारपासून भारतीय ‘अ’ संघाबरोबर तीनदिवसीय सराव सामन्याला सुरुवात होत आहे. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला आपल्या फिरकीपटूंची कसोटी असेल. कारण भारतातल्या खेळपट्टीवर त्यांचा हा पहिला सामना असेल. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंची कामगिरी कशी होते, यावर ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची रणनीती ठरू शकेल.

गेल्या चार वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतात ९ कसोटी सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुबईमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टीवर सराव केला आहे. पण त्यांच्या खऱ्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होईल.

भारतीय ‘अ’ संघाला या वेळी कमी लेखून चालणार नाही. कारण या संघात गुणवान आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा शाहबाझ नदीम, कुलदीप यादव यांच्यावर फिरकी गोलंदाजीचा भार असेल. अशोक दिंडासारखा भारतीय संघाचा अनुभव असलेला वेगवान गोलंदाज संघात आहे. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंडय़ाही अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. फलंदाजीमध्ये अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर हे दोन फॉर्मात असलेले मुंबईकर आहेत. त्याचबरोबर या हंगामात फलंदाजीमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारे प्रियांक पांचाळ, रिषभ पंत आणि अंकित बावणे यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाकडे नॅथन लिऑन आणि अ‍ॅश्टॉन अगर हे दोन मुख्य पिरकीपटू आहेत. लिऑनने यापूर्वीही भारतीय फलंदाजांना हैराण केले आहे. त्यामुळे या सामन्यात त्याची कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. अगरला या सामन्यातून बरेच काही शिकता येणार आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हेदेखील फिरकी गोलंदाजी करू शकतात. मिचेल स्टार्क हा वेगवान गोलंदाज भन्नाट फॉर्मात आहे. पण भारताच्या खेळपट्टय़ांवर त्याची गोलंदाजी कितपत वेगवान होते, हे पाहावे लागेल. त्याला जोश हेझलवूड साथ देऊ शकतो. मध्यमगती, पण अचूक चेंडू टाकण्यासाठी हेझलवूड प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याला भारताच्या खेळपट्टय़ांकडून थोडी मदत मिळू शकते.

धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा हुकमी एक्का असेल. तो किती वेळात शतक पूर्ण करू शकतो, यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा त्याला दांडगा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे त्याला भारतात फलंदाजी करताना जास्त समस्या येणार नाही. उस्मान ख्वाजा, स्मिथ, मॅक्सवेल हे फिरकीचा सामना कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्वेपसन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड आणि जॅक्सन बर्ड यांचा हा पहिलाच भारतीय दौरा आहे. त्यामुळे त्यांना वातावरणाशी जुळवून घेताना थोडी समस्या जाणवू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत ‘अ’ : हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अखिल हेरवाडकर, प्रियांक किरीट पांचाळ, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, इशान किशन (यष्टिरक्षक), शाहबाझ नदीम, कृष्णप्पा गोवथाम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक दिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंग, बाबा इंदरजित.
  • ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट व्ॉड (यष्टिरक्षक) मिचेल स्टार्क, जोश हॅझेलवूड, जॅक्सन बर्ड, नॅथन लिऑन, स्टीव्हन ओ’किफे, अ‍ॅश्टॉन अगर, मिचेल स्वीपसन.
  • वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून.

First Published on February 17, 2017 2:19 am

Web Title: india vs australia 2