यशस्वी संघासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती समन्वय आणि क्रम यांची. कोणत्या फलंदाजाला किंवा कोणत्या गोलंदाजाला कोणत्या क्रमावर उतरवायचे हा निर्णय घेणे सर्वात कठीण काम असते. सध्या भारतीय संघ फलंदाजीच्या बाबतीत दादा समजला जात असला तरी चौथ्या क्रमांकावर आश्वस्तपणे खेळणारा फलंदाज भारतीय संघाला सापडला नसून हीच संघापुढील सर्वात मोठी चिंता आहे.
भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सलामीला यायचे, त्यानंतर गौतम गंभीर आणि त्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळायला यायचा. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली, सेहवाग आणि गंभीर वाईट कामगिरीमुळे संघाबाहेर गेले. त्यामुळे कोहलीला बढती देऊन तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला पाठवले आणि या स्थानावर त्याने आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. चौथ्या स्थानावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाच फलंदाजांना खेळवून पाहिले, पण एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
पहिल्यांदा युवराज सिंगला चौथ्या क्रमाकांसाठी पहिली पसंती देण्यात आली, पण युवराजला कॅन्सरने ग्रासले आणि या स्थानावर वर्णी लागली ती रोहित शर्माची. २०१२ साली ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेत रोहितला चौथ्या क्रमाकांवर खेळताना पाच डावांमध्ये ७९ धावा करता आल्या. त्यानंतर आशिया चषकात तीन सामन्यांमध्ये त्याने ७२ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला फक्त १३ धावा करता आल्या आणि त्याला ही जागा गमवावी लागली. त्यानंतर सहाव्या क्रमाकांवर खेळणाऱ्या सुरेश रैनाला बढती देत चौथे स्थान देण्यात आले. त्यानंतर काही काळ दिनेश कार्तिकही चौथ्या स्थानावर खेळला. त्यानंतर युवराज आणि पुन्हा रैनाकडे चौथे स्थान आले, पण एकालाही या स्थानाला न्याय देता आला नाही. त्यामुळेच आता या स्थानासाठी चेतेश्वर पुजाराला संघात स्थान देण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे.